
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल त्यांच्या समर्थनार्थ धावून आले आहेत. “जर गंभीरला प्रशिक्षकपदावरून हटवले, तर हिंदुस्थानी संघातील खेळाडूंना हाताळणे अत्यंत कठीण होईल,” असे परखड मत मुनाफ पटेलने व्यक्त केले आहे. गंभीर हा एक प्रामाणिक व्यक्ती असून तो नेहमी सत्य बोलतो, म्हणूनच अनेक लोक त्याला नापसंत करतात, असेही त्याने नमूद केले.
मुनाफ पटेल याने ‘बॉम्बे स्पोर्ट एक्सचेंज’ पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले की, गंभीर हा एकमेव असा व्यक्ती आहे जो सध्याच्या खेळाडूंना शिस्त लावू शकतो. खेळाडूंमध्ये त्याचा धाक असणे आवश्यक आहे. मुनाफ यांच्या मते, प्रशिक्षक हा खेळाडूंचा मित्र नसावा; जर प्रशिक्षक मित्र बनला तर संपूर्ण व्यवस्था बिघडू शकते. गंभीरकडे कडक निर्णय घेण्याची आणि गरज पडल्यास मोठ्या खेळाडूंना संघातून वगळण्याची धमक आहे, जी संघाच्या हिताची आहे.
गंभीरच्या कार्यकाळात टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी-20 विश्वचषक यांसारखी मोठी जेतेपदे मिळवली असली, तरी कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीमुळे त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र, मुनाफ पटेलने गंभीरच्या निष्ठेवर विश्वास दर्शवला आहे. “गंभीर कधीही पैशांसाठी क्रिकेट खेळला नाही, त्याला खेळाबद्दल मनापासून प्रेम आहे. जर तो पुढील काही वर्षे पदावर राहिला नाही, तर संघातील शिस्त विस्कळीत होईल,” असा इशारा मुनाफ पटेल याने दिला आहे.




























































