
>> चंद्रशेखर कमळाकर दाभोळकर, [email protected]
केंद्र सरकारने अलीकडच्या काळात अनेक रेल्वे स्थानकांची नावे बदलली आहेत. मात्र फक्त नाना शंकरशेट यांचे नाव सध्याच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला देण्याबाबत एवढा विलंब का? मुंबई आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहर बनवण्यात नानांचा कोटी मोलाचा सहभाग पाहता त्यांच्या नावाला होणारा विलंब हा मराठी अस्मितेचा आणि कृतज्ञतेचा अवमानच म्हणावा लागेल. इतिहासाने ज्यांचे नाव सुवर्णक्षरांनी लिहिले आहे, त्यांना सरकारी कागदपत्रात स्थान मिळवण्यासाठी वाट पाहावी लागणे, हे केंद्रीय आणि राज्यातील सरकारचे अपयश आहे.
भारतीय रेल्वे धावू लागली त्याला दीड शतकाहून अधिक काळ लोटला. 16 एप्रिल 1853 रोजी भारतात (मुंबई ते ठाणे) पहिली रेल्वे धावली त्या ‘द ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIPR) च्या स्थापनेत आधुनिक मुंबईचे शिल्पकार, थोर शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाणारे दूरदृष्टीचे नेते नामदार नाना शंकरशेट यांनी निर्णायक भूमिका बजावली. जमशेदजी जिजिबॉय यांच्या समवेत रेल्वेचे संचालकपदही त्यांनी भूषविले होते. संचालकपद भूषविणारे ते पहिले भारतीय होते.
शिक्षण, वाहतूक आणि नगररचनेत तन, मन, धन अर्पून मोलाचे योगदान नानांनी दिले. मात्र आचार्य अत्रे यांनी ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’ संबोधिलेल्या नाना शंकरशेट यांना तत्कालीन इतर समाजसुधारकांच्या तुलनेत योग्य सन्मान मिळायला आणि सर्व क्षेत्रांतल्या अलौकिक, महान कार्याचा गौरव होण्यास खूप उशीरच झाला.
मुंबईच्या विकासात विशेषतः बॉम्बे म्युनिसिपल अॅक्ट तयार करणे आणि शहराच्या संस्थात्मक जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. ज्या दिवशी पहिली रेल्वे धावली तो दिवस रेल्वे दिन म्हणून साजरा केला जातो. रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीच्या नानांच्या मोलाच्या योगदानामुळे रेल्वे दिन आणि नाना शंकरशेट याचे अतूट नाते आहे. आज जेव्हा आपण रेल्वेच्या अत्याधुनिक रूपाकडे पाहतो, तेव्हा या क्रांतीचा पाया रचणाऱ्या नाना शंकरशेट यांच्या नावाचा विसर अगदी रेल्वे अधिकाऱ्यांनासुद्धा पडणे हे दुर्दैवी आहे.
मुंबईच्या टाऊन हॉलमध्ये विराजमान असलेला ब्रिटिश काळात जिवंतपणीच तयार केलेला नानांचा पुतळा त्यांचे ब्रिटिश दरबारी असलेले महत्त्व पटवून देतो, परंतु मुंबई सेंट्रल टर्मिनसचे शंकरशेट मुंबई टर्मिनस नामकरणाचा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने सर्वपक्षीय मान्यतेने केंद्राकडे पाठविलेल्या प्रस्तावाला अजून हिरवा पंदील मिळत नाही. याचा अर्थ स्वकीयांना त्यांच्या कार्याचे महत्त्व कळले नाही असा मानायचा का?
दरवर्षी रेल्वे दिन आला की, नानाप्रेमींना नाना चौकात एकत्र येऊन नाना शंकरशेट यांना अभिवादन केल्यावर सदर नामकरणाच्या प्रलंबित मागणीच्या पूर्ततेसाठी शांतपणे का होईना, पण आंदोलने करावी लागतात ही शोकांतिका आहे. नानांच्या योगदानाचा लोकप्रतिनिधी, राजकीय नेतेमंडळी, शासनाचे, रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी कोणी कोणी इन्कार करत नाही, परंतु नामकरणाची मागणी पूर्ण होण्यास लागणाऱ्या विलंबाचे कारण प्रशासकीय दिरंगाई, तांत्रिक प्रक्रिया असे समजत असले तरी ते अद्यापही स्पष्ट होत नाही. या गोंधळाच्या स्थितीमुळे राजकीय श्रेयवादात सदर मागणी अडकून बसली की काय असा संशय येतो.
नाना शंकरशेट यांनी केवळ मुंबईच नाही, तर संपूर्ण देशाच्या प्रगतीला वेग देण्याचे काम केले. 18 व्या शतकात जेव्हा रेल्वे भारतीयांसाठी आकलनाच्या पलीकडे होती, तेव्हा दूरदृष्टीने दळणवळणाचे मुख्य साधन बनलेल्या गोष्टीचे महत्त्व नानांनी जाणले होते.
पहिल्या रेल्वेच्या ऐतिहासिक प्रवासात सहभाग घेतलेल्या नानांनी रेल्वेचे कार्यालय चालवण्यासाठी आपल्या स्वतःचा वाडा दिला होता, ही बाब त्यांच्या निःस्वार्थी वृत्तीची साक्ष देते. स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यासाठीसुद्धा स्वतःच्या वाडय़ातच जागा दिली होती. जी आजतागायत आपले अस्तित्व टिकवून आहे.
विविध सत्ताधाऱ्यांनी वेळोवेळी आश्वासने दिली. मात्र अंमलबजावणी नाहीच. फाईल्स तशाच धूळ खात पडल्या आहेत. नाना शंकरशेट प्रतिष्ठान व दैवज्ञ समाजोन्नती परिषद आणि तमाम नानाप्रेमी सातत्याने नामकरणाच्या मागणीचा पाठपुरावा करत आहे. नानांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्याच्या मागणीला सत्तेचा विलंब म्हणायचा की जाणीवपूर्वक दुर्लक्ष, हेच कळेनासे झालेय? केंद्र सरकारने अलीकडच्या काळात अनेक रेल्वे स्थानकांची नावे बदलली आहेत. मात्र फक्त नाना शंकरशेट यांचे नाव सध्याच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला देण्याबाबत एवढा विलंब का? मुंबई आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहर बनवण्यात नानांचा कोटी मोलाचा सहभाग पाहता त्यांच्या नावाला होणारा विलंब हा मराठी अस्मितेचा आणि कृतज्ञतेचा अवमानच म्हणावा लागेल. इतिहासाने ज्यांचे नाव सुवर्णक्षरांनी लिहिले आहे, त्यांना सरकारी कागदपत्रात स्थान मिळवण्यासाठी वाट पाहावी लागणे, हे व्यवस्थेचे अपयश आहे.
शिक्षण, समाजसुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आधुनिक भारताची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देत असताना सरकारने मेहरबानीची भावना मनातून काढून त्यांनी केलेल्या अष्टपैलू कार्याचा तो एक छोटासा सन्मान मानावा. सत्ताधाऱ्यांनी त्यासाठी ‘तारीख पे तारीख’ देण्याचे थांबवावे व तातडीने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करावे. तेच नाना शंकरशेट यांना खरे अभिवादन ठरेल!
(लेखक जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठान कोषाध्यक्ष आहेत.)



























































