नेस्को ड्रग्जप्रकरणी शिवसेना आक्रमक, वनराई पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगाव पूर्व येथील नेस्को संकुल येथे झालेल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाला असून या घटनेमुळे मुंबईतील कायदा- सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याविरोधात शिवसेनेच्या वतीने बुधवारी वनराई पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आले. ड्रग्जप्रकरणी आयोजक आणि प्रशासकीय यंत्रणेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केवळ ड्रग्ज पुरवठाधारकावर नव्हे, तर आयोजकांवरदेखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, कोणतीही प्रशासकीय परवानगी न पाहता संकुल भाडय़ाने देणाऱया संकुल मालक आणि यात सामील असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करावा, या घटनेला जबाबदार असणाऱया सुरक्षा एजन्सीचा परवाना रद्द करावा, रॅकेटमधील सर्वांवर मोकोका अंतर्गत कारवाई करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

शिवसेनाच्या या आंदोलन प्रसंगी शिवसेना नेते, विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू, शिवसेना उपनेत्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव–नगरसेवक साईनाथ दुर्गे, आमदार बाळा नर, युवासेना कार्यकारिणी सदस्य-नगरसेवक अंकित प्रभू, नगरसेवक सुहास वाडकर, शिवानी परब, तुळशीराम शिंदे, जितेंद्र वळवी, लोना रावत, लक्ष्मी फाळके-भाटिया, योगिता कदम, पुष्पा कळंबे, मानसी जुवाटकर, विभाग संघटक शालिनी सावंत, शुभदा शिंदे तसेच इतर नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

तरुण पिढी बिघडण्याचे काम महाराष्ट्राची राजधानी मुंबईत होत आहे. महायुती सरकारच्या काळात हे प्रकार घडत आहेत. गृह विभाग आणि पोलीस विभाग नक्की काय करतोय? ही सुरुवात असून असे प्रकार आताच रोखले पाहिजेत. याच्या मुळाशी जे कोणी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. 

सुनील प्रभू, विभागप्रमुख-आमदार