
माथेरानच्या घाटात बिबट्याचे दर्शन झाले आहे. दस्तुरी नाक्याजवळ एका वळणावर एका धावत्या गाडीच्या समोर अचानक हा बिबट्या आल्याने पर्यटकांसह वाहनचालकाची पाचावर धारण बसली. याबाबतचा फोटो टॅक्सीचालकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्यामुळे तळपत्या उन्हात थंड हवेचा अनुभव घेत माथेरानमध्ये फेरफटका मारणाऱ्या पर्यटकांच्या मनात ‘कुणी तरी आहे तिथं’ या भीतीने धडकी भरली आहे.
जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान घाटात मंगळवार रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले. दस्तुरी नाका येथील चांगभलं मंदिर परिसरातील खालच्या वळणावर अचानक बिबट्या गाडीसमोर धावत आल्याचे वाहनचालकांनी सांगितले. यावेळी टॅक्सीचालक महेंद्र जाबरे यांनी प्रसंगावधान राखत गाडी थांबवली व संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. वाहनात बसलेल्या पर्यटकांनीही हा थरार प्रत्यक्ष अनुभवला.
पर्यटनावर परिणाम होणार
निसर्गरम्य माथेरानमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. येथील दऱ्या-खोऱ्यांमध्ये फेरफटका मारून प्रत्येक जण हे सौंदर्य आपल्या डोळ्यांत साठवतात. मात्र आता बिबट्याच्या दर्शनाने पर्यटकांना धडकी भरली असून आडमागनि फिरताना अचानक बिबट्याने हल्ला केला तर ही भीती प्रत्येकाच्या मनात आहे. याचा येथील पर्यटन व्यवसायासह परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




























































