
रोहा येथील कुंडलिका नदीच्या काठावर जैविक कचऱ्याची होळी केल्याचा प्रकार समोर आला आहे. जैविक कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे असताना रात्रीस खेळ करत कुंडलिका नदीच्या काठावर हा कचरा जाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यातून निघालेल्या प्रचंड धुराने नदीच्या परिसरातील रहिवाशी अक्षरशः घुसमटले. यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या नगर परिषदेने भंगार व्यावसायिक तसेच नोंदणीकृत रुग्णालयांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीदेखील उद्या या ठिकाणी स्पॉट व्हिजीट करून पंचनामा करणार आहेत.
नगरपालिकेने शहरात सुका-ओला कचरा वर्गीकरणासह घनकचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी धोरण आखले असतानाच वैद्यकीय कचरा थेट नदीकाठी जाळला जात असल्याने संपूर्ण कचरा व्यवस्थापनच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या प्रकारामुळे शहरातील आरोग्य व्यवस्था आणि पर्यावरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या आगीत सलाईनच्या रिकाम्या बाटल्या, वापरलेल्या सुया, इंजेक्शनच्या काचेच्या बाटल्या, रक्ताने माखलेले कापसाचे गोळे यासारखा अत्यंत धोकादायक वैद्यकीय कचरा जाळला जात असल्याचे उघड झाले. हा प्रकार केवळ बेकायदेशीरच नाही तर नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ करणारा असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
बोगस डॉक्टरांवर कारवाई करा
चिपळूण लोटे एमआयडीसीमधील ‘महाराष्ट्र बायो हायजेनिक मॅनेजमेंट’ संस्था नियमितपणे हा कचरा गोळा करून वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावत असतानाही असा प्रकार घडणे अधिकच संशयास्पद ठरत आहे. रोह्यात ६० नोंदणीकृत डॉक्टर आणि १२ प्रयोगशाळा असताना काही बेकायदेशीर डॉक्टरही कार्यरत असल्याचे समोर आले आहे. या अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांवर तत्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
दोषींवर कठोर कारवाई
घटनेनंतर पालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून भंगार व्यावसायिक आणि नोंदणीकृत डॉक्टरांना नोटीस बजावण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या गंभीर प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपालिका सभापती मयूर दिवेकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यापूर्वीही डिसेंबर २०२२ मध्ये अशाच प्रकारे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर आढळून आला होता. त्यानंतर पालि केने मार्गदर्शन शिबीर घेत उपाययोजना केल्या होत्या.




























































