
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा, बटाटा तसेच इतर व्यवसायांमध्ये 50 किलो व त्यापेक्षा जास्त वजनाच्या गोण्यांची चढउतार करणे माथाडी कामगारांना त्रासाचे होते. त्यातून उतारवयात अनेक व्याधी जडतात. त्यामुळे राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या एका गोणीमध्ये 50 किलोपेक्षा अधिक माल असू नये, असे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत.
आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने याआधीच हा निर्णय घेतला होता. मालाची चढउतार करणाऱ्या कामगारांचे शारीरिक हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी असे पेंद्र सरकारने राज्याला कळविले होते. राज्य शासनाने याआधी परिपत्रकान्वये तशा सूचनाही माथाडी मंडळांना दिल्या होत्या. या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची मागणी विविध कामगार संघटनांकडून होत होती. त्यानुसार पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात कामगार संघटना, व्यापारी संघटना, कामगार विभाग, किराणा बाजार व दुकाने मंडळ हेदेखील या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कांदा, बटाटा व इतर व्यवसायामध्ये व्यापाऱ्यांकडे 50 किलो व त्यापेक्षा जास्त वजनाच्या गोण्यांची चढउतार करणे कामगारांना त्रासाचे होत असते. त्यामुळे शेतमालाची चढउतार करणाऱ्या कामगारांना शारीरिक त्रास होऊ नये म्हणून शेतमालाच्या गोणीची मर्यादा 50 किलोपर्यंत ठेवण्यास कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सांगण्यात आले आहे.
वजन मर्यादेसाठी जनजागृती
बाजार समित्यांनी आता सर्व शेतकऱ्यांनी गोणीची वजन मर्यादा 50 किलोपर्यंतच असावी यासाठी जनजागृती करावी. शेतमालाच्या गोणीची वजन मर्यादा 50 किलोपर्यंतच ठेवण्याच्या सूचना सर्व संबंधित व्यापाऱ्यांना देण्यात याव्यात. बाजार समित्यांमध्ये 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणीची चढउतार होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच या निर्णयामुळे कोणत्याही बाजार समितीच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही याचीही काळजी घेण्याचे निर्देश राज्य सरकारने जारी केले आहेत.


























































