
छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातील वेदांताच्या वीज प्रकल्पात झालेल्या भीषण स्फोटप्रकरणी वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. डभरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106 (निष्काळजीपणामुळे मृत्यू), 289 (यंत्रसामग्री संदर्भातील निष्काळजी वर्तन) आणि 3(5) (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती सक्तीचे पोलीस अधीक्षक प्रफुल ठाकूर यांनी दिली.
ही दुर्घटना 14 एप्रिल रोजी सिंहितराई गावातील वीज प्रकल्पात घडली. बॉयलरमधून टर्बाइनकडे जाणाऱ्या उच्च दाबाच्या वाफेची वाहतूक करणारी स्टील ट्यूब फुटल्याने भीषण स्फोट झाला. या स्फोटात अनेक कामगार गंभीररित्या भाजले. प्राथमिक तपासात बॉयलरच्या फर्नेसमध्ये जास्त प्रमाणात इंधन साचल्याने दाब वाढला आणि त्यामुळे स्फोट झाल्याचे समोर आले आहे.
मुख्य बॉयलर निरीक्षकांच्या अहवालानुसार, फर्नेसमध्ये साचलेल्या इंधनामुळे प्रचंड दाब निर्माण झाला आणि त्यातून बॉयलरमध्ये स्फोट झाला. या दाबामुळे बॉयलरची खालची पाइप आपली जागा सोडून बाहेर फेकली गेली आणि मोठी दुर्घटना घडली. तसेच सक्ती येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (FSL) अहवालातही इंधन साठा आणि वाढलेला दाब हेच स्फोटाचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
























































