
जैतापूर-धाउलवल्ली या गावांना जोडणाऱ्या सागरी महामार्गावरील सुमारे ५०० मीटर लांबीच्या जैतापूर खाडी पुलावर महावितरणकडून टाकण्यात आलेली ११ केव्ही विद्युत वाहिनी धोकादायक ठरत असल्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या पुलावर मोठ्या प्रमाणावर नागरिक सूर्योदय-सूर्यास्त पाहण्यासाठी तसेच खाडीतील विहंगम दृश्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे येथे उघड्यावरून टाकण्यात आलेली केबल भविष्यात अपघातास कारणीभूत ठरू शकते, अशी चिंता व्यक्त होत आहे.
सध्या महावितरणकडून अंडरग्राउंड केबल टाकण्याचे काम विविध गावांमध्ये सुरू असून, या कामादरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणी हाताने खोदकाम करणे आवश्यक होते, त्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने काम करण्यात आल्याने विद्यमान पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असल्याचेही सांगितले जात आहे.
गावागावात अशी परिस्थिती असताना स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत शांत असल्याची नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. काही जागरूक नागरिकांनी या कामाविषयी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना विकासाच्या आड येत असल्याचे सांगत दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही बोलले जात आहे. पावसाळ्यात या कामाचे दुष्परिणाम दिसून येण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे.
दरम्यान, जैतापूर खाडी पुलावरून दोन ११ केव्ही केबल टाकताना सुरक्षेची पुरेशी काळजी घेतलेली दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पुलाच्या कठड्यावरील लोखंडी बारवरून उघड्या स्वरूपात केबल नेण्यात आल्याचे दिसत असून, हे अत्यंत धोकादायक ठरू शकते अशी भीती व्यक्त होत आहे. सायंकाळच्या वेळी या पुलावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक व स्थानिक नागरिक उपस्थित असतात. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, महावितरणच्या कामासाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच केबल सुरक्षित पद्धतीने पुलाच्या पलीकडे नेण्याबाबत सूचना करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तर संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी केबल सिमेंट ब्लॉकमध्ये बंदिस्त करून सुरक्षित करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात केबल उघड्यावरूनच टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे.
या उघड्या केबलमुळे पुलाचे विद्रूपीकरण झाल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. महावितरणकडून ठेकेदाराला अशाच पद्धतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या का, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने यास मान्यता दिली आहे का, याबाबत स्पष्ट माहिती मिळणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला संबंधित विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार असतील, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.





























































