Nanded crime news – 30 लाखांहून अधिक किमतीचा बंदी घातलेला गुटखा जप्त; नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड ग्रामीण पोलिसांनी ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत कारवाई करत 16 मे रोजी रात्री कांदा मार्केट चौक परिसरात एका वाहनातून तब्बल 30 लाख 63 हजार 650 रुपयांचा बंदी घातलेला गुटखा आणि सुगंधित पान मसाला जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या आदेशाने ग्रामीण पोलिसांचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना तेलंगणातून एका पिकअप (एम.एच.-37-टी -3601) वाहनातून गुटखा आणला जात असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला असता संशयित बोलेरो पिकअप चालकाने पोलिसांना पाहून वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपी चालक रईस मोहम्मद अमेर मोहम्मद (वय – 31, रा. आदिलाबाद, तेलंगणा) याला अटक केली असून वाहनाची झडती घेतली असता त्यात विमल, आर.के. क्लासिक, पान सम्राट यांसारख्या विविध कंपन्यांचा तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळला. पोलिसांनी गुटख्यासह पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी मारोती शंकरराव पाटील यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, 281 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का? याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.