विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अंतिम जागावाटप दोन दिवसात पूर्ण होईल; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत झाली. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे, आमदार अनिल परब, आमदार मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अंतिम जागावाटप दोन दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून १६ जागांसाठी निवडणूक होत आहे. तसेच नागपूरच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. अशा विधान परिषदेच्या एकूण १७ जागांच्या निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढणार आहोत. आणि भारतीय जनता पक्षाचा लोकशाही विरोधी आणि जो घोडेबाजार मांडला आहे याचा निषेध या निमित्ताने करतो. सुदृढ लोकशाहीसाठी आणि निवडून येण्याच्या फार मोठ्या संभावना आहेत. कारण सत्ता ही केंद्रीत झालेली आहे आणि गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारचे हे सरकार असल्यामुळे त्यांच्यातील धुसफूस अर्थातच आमच्या पथ्यावर पडणार आहे. त्या अनुशंगाने महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीसाठीच्या जागावाटपावर आज प्राथमिक चर्चा आमची झाली आहे. तुल्यबळ उमेदवार महाविकास आघाडीजवळ आहे. या प्राथमिक चर्चेच्या अनुशंगाने दोन दिवसात आम्ही पुन्हा बसून अंतिम जागावाटप पूर्ण होईल. कुठलाही तिढा नाही, कुठलाही गोंधळ नाही आणि सुसंवादाच्या माध्यमातून या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत, अशी माहिती सपकाळ यांनी दिली.

दुर्दैवाने भाव खुलले, भाव उघडले, भाव ठरले… अशा प्रकारचे शब्द प्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या निवडणुकी समोर येत आहेत. भारतीय जनता पक्षाचं पाप या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांमध्ये महापालिका, नगरपालिकांमध्ये पैसा फेक, तमाशा देख हे वगनाट्य संपन्न करत असताना जो तमाशा मांडला होता त्यातून आता हा दुसरा अंक आहे. त्यामुळे पाच लाख अॅडव्हान्स घे, मतदान झाल्यानंतर पाच लाख देतो असं म्हणून मोबाइल जप्त करून नगरसेवकांना उचलण्याचं काम या महायुती सरकारने, भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या मित्र पक्षांनी सुरू केलेलं आहे. त्यांचा स्वतःवर विश्वास नाही. लोकशाहीवर विश्वास नाही म्हणून हा घोडाबाजार मांडलेला आहे. यामध्ये वेगवेगळ्या पक्षातील अपक्ष आणि स्वतःच्या पक्षातील लोकांना पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांनी उचललं आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.