
वायव्य हिंदुस्थानामध्ये सध्या सूर्याचा प्रकोप पाहायला मिळत असून राजस्थान, हरयाणा आणि दिल्लीसह अनेक राज्ये तीव्र उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडली आहेत. या भीषण उन्हाळ्यात राजस्थानमधील श्री गंगानगर येथे बुधवारी 48.2 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली असून हे ठिकाण सध्या जगातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे. विशेष म्हणजे हे तापमान चालू मे महिन्यातच उत्तर प्रदेशातील बांदा येथे नोंदवलेल्या ऐतिहासिक उच्चांकी तापमानाइतकेच आहे.
सध्या संपूर्ण वायव्य हिंदुस्थानाला जणू काही भट्टीचे स्वरूप आले आहे. बुधवारी राजस्थानमधील बिकानेर आणि हरियाणातील रोहतक येथे 46.6 अंश सेल्सिअस, तर जैसलमेर आणि चुरू येथे 46.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. याशिवाय झांशीमध्ये 46 अंश, हिसारमध्ये 45 अंश आणि देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये 44.6 अंश सेल्सिअस एवढ्या तीव्र तापमानामुळे नागरिक होरपळून निघाले आहेत. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, गुरुवार संध्याकाळपर्यंत उत्तर आणि मध्य हिंदुस्थानातील हवामानात बदल होण्यापूर्वी तापमानाचा हा पारा आणखी एक दिवस याच पातळीवर राहण्याची दाट शक्यता आहे.
श्री गंगानगरमधील या ऐतिहासिक उष्णतेमागे तिहेरी भौगोलिक आणि वातावरणीय कारणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय, सध्या उत्तर हिंदुस्थानावर कोणताही वेस्टर्न डिस्टर्बन्स नसल्याने निरभ्र आकाश आणि स्थिर वातावरणामुळे ही उष्णता सातत्याने साचून राहिली आहे. कालवे सिंचन आणि शेतीचा विकास झालेला असूनही आजूबाजूच्या वाळवंटी प्रभावामुळे गंगानगरला या तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. सध्या तरी, गंगानगर हे देशातील आणि जगातील भीषण उन्हाळ्याचे मुख्य केंद्र बनले आहे.


























































