Singapore Open 2026 – सात्विक-चिराग जोडीची ऐतिहासिक कामगिरी, पटकावले पुरुष दुहेरीचे विजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या स्टार जोडीने Singapore Open 2026 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले आहे. रविवारी (31 मे 2026) झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात चौथ्या मानांकित हिंदुस्थानी जोडीने इंडोनेशियाच्या फजार अल्फियान आणि मुहम्मद फिक्री या तिसऱ्या मानांकित जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. पहिला गेम गमावल्यानंतर जोडीने दमदार पुनरागमन करत 1 तास 13 मिनिटांत हा सामना खिशात घातला. सिंगापूर ओपनचे विजेतेपद पटकावणारी ही पहिलीच हिंदुस्थानती दुहेरी जोडी ठरली आहे.

हिंदुस्थानी जोडीसाठी हे तिसरे सुपर 750 विजेतेपद आहे. यापूर्वी त्यांनी 2022 आणि 2024 मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवले होते. या सामन्यात पहिल्या गेममधील पराभवानंतर सात्विक आणि चिरागने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर दुसऱ्या गेममध्ये दमदार पुनरागमन केले. निर्णायक आणि तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीला 11-5 अशी मोठी आघाडी घेतल्यानंतर इंडोनेशियाच्या जोडीने 11-12 असा फरक कमी केला होता. मात्र हिंदुस्थानी खेळाडूंनी आपला संयम राखत सलग गुण वसूल केले आणि अंतिम सामन्यात बाजी मारली.

या ऐतिहासिक विजयानंतर भावना व्यक्त करताना सात्विक म्हणाला, “जवळपास दोन वर्षांच्या अंतरानंतर आम्ही कोणतेतरी विजेतेपद पटकावले आहे, त्यामुळे मी सध्या थोडा सुन्न झालो आहे. या स्पर्धेत येण्यापूर्वी आम्ही थोडे धास्तावलो होतो, कारण भूतकाळात या ठिकाणी आमची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. मात्र, हा संपूर्ण आठवडा आमच्यासाठी अत्यंत विशेष आणि अविस्मरणीय ठरला.” असे सात्विक म्हणाला.