
राजधानी दिल्लीत आज काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. एका सहा मजली हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले. मृतांमध्ये 17 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. धगधगत्या आगीतून 40 जणांची कशीबशी सुटका करण्यात आली, तर जीव वाचवण्यासाठी काही जणांनी इमारतींमधून उडय़ा मारल्या. या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये ‘फ्लरिश स्टे’ हे हॉटेल आहे. तळमजल्यावर रेस्टॉरंट आणि इतर मजल्यांवर 25 निवासी खोल्या असलेल्या या हॉटेलमध्ये सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. हॉटेलला एकच प्रवेशद्वार असल्यामुळे लोकांना पटकन बाहेर पडता आले नाही. खिडक्या उघडून काहींनी खाली उडय़ा मारून आपला जीव वाचवला.
आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने पोहोचायला बराच उशीर केला. अन्यथा अनेक जीव वाचले असते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
10 पोलीसही जखमी
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. आग आटोक्यात आणताना 10 पोलीस कर्मचारी जखमी झाले. मृतांपैकी 17 जण नायजेरिया, मोझांबिक, बांगलादेश, सोमालिया, लायबेरिया आणि अफगाणिस्तानातील असून त्यांची ओळख पटली आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्ण व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगीच्या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची, तर जखमींना 50 हजारांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्टद्वारे केली.

























































