
मुंबईतील ८२ इमारती ‘म्हाडा’ने अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. त्यामुळे तेथील रहिवाशांना बेघर होण्याची भीती वाटत आहे. त्या रहिवाशांसाठी शिवसेना धावून गेली आहे. शिवसेना वनवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून संबंधित इमारतींमधील रहिवाशांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी केली आहे.
या इमारतींमधील रहिवाशांची योग्य नोंद करण्यात यावी, त्यांच्या जीवितास धोका होणार नाही याची खात्री करण्यात यावी, तसेच त्यांचा घरावरील हक्क अबाधित राहील यासाठी ठोस निर्णय घेण्यात यावेत.
म्हाडाने जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींची यादी ३० मे रोजी जाहीर केली. या इमारतींमध्ये हजारो कुटुंबे पिढ्यान्पिढ्या राहत आहेत. अतिधोकादायक घोषित झाल्याने इमारतींचे जागामालक रहिवाशांवर दबाव आणून त्यांना इमारतींमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शकतात. तसेच सरकारकडूनही निष्कासनाची कारवाई केली जाऊ शकते, अशी भीती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

























































