
जागतिक पर्यावरण दिन साजरा करणाऱ्या सरकारवर आणि सत्ताधारी यंत्रणांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. या सरकारमध्ये राहून पर्यावरण दिन साजरा करणे म्हणजे निव्वळ फार्स, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
‘एक्स’वरील पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि महापालिकांवर पर्यावरणविरोधी निर्णय घेतल्याचा आरोप केला. राज्य सरकार आणि महानगरपालिकांना आधी महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलू द्या, मगच त्यांनी व्हिडिओ आणि रील्स बनवावेत, असा सणसणीत टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. पर्यावरणासंदर्भातील नियम डावलून राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांची एकापाठोपाठ नावे देत यादीच दिली आहे.
Anybody from this regime celebrating World Environment Day is a farce!
For the State and Municipal Corporations, let them speak on the following first before they can make videos and reels:
1) Allowing mines by diluting tiger corridors in Gadchiroli
2) Diluting the Eco…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 5, 2026
‘राज्य सरकार आणि महानगरपालिकांना आधी खालील मुद्द्यांवर बोलू द्या, मगच त्यांनी व्हिडिओ आणि रील्स बनवावेत:
१) गडचिरोलीतील व्याघ्र कॉरिडॉरची व्याप्ती कमी करून खाणींना परवानगी देणे.
२) सह्याद्री-पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचे नियम शिथिल करणे.
३) मुंबईतील ४५,००० कांदळवने तोडण्याचा प्रस्तावित प्लॅन.
४) गरगाई धरण प्रकल्पासाठी तानसा वन्यजीव अभयारण्यातील ५ लाख झाडे तोडण्याचा प्रस्तावित प्लॅन.
५) “मास्टर प्लॅन”च्या नावाखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंगले आणि हॉटेल्सच्या बेकायदेशीर अतिक्रमणांना कायदेशीर मान्यता देणे.
६) काही मोजक्या बिल्डरांच्या फायद्यासाठी ठाण्यातील येऊर जंगलाची वनजमीन वळवणे.
७) अजिबात गरज नसलेल्या रस्त्यासाठी पुण्याच्या वेताळ टेकडीवर प्रस्तावित वृक्षतोड करणे.
८) पुण्यातील रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प, जे जगातील एकमेव असे उदाहरण आहे जिथे नदी अरुंद आणि उथळ केली जाईल; यामुळे पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात पुराचा धोका वाढेल.
९) नागपूर शहरातील ‘अजनी वन’ कापण्यासाठी सरकार दाखवत असलेली कमालीची घाई.
१०) पुण्याच्या एम्प्रेस बॉटनिकल गार्डन मधील झाडे तोडण्याचा प्रस्तावित प्लॅन.
११) मूलभूत प्रदूषण नियंत्रण उपायांची अंमलबजावणी न करून, औष्णिक वीज प्रकल्पांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यात आलेले अपयश.
१२) औष्णिक वीज प्रकल्पांजवळील फ्लाय ॲश पाँड्स आणि कोल वॉशरीज बंद करण्यात आलेले अपयश.
१३) “विकास”च्या नावाखाली नाशिकमध्ये केली जाणारी वृक्षतोड, त्यातही तपश्चर्येची भूमी असलेल्या ‘तपोवन’ परिसरातील झाडे तोडण्याचा प्रस्तावित प्लॅन.
१४) बीएमसीने (BMC) मनोरंजन मैदाने आणि खेळाची मैदाने बिल्डरांसाठी निवासी भूखंडांमध्ये रूपांतरित करणे.
ही यादी अशीच पुढे वाढत जाईल’, असे आदित्य ठाकरे यांनी X वर म्हटले आहे.
पर्यावरण दिन साजरा करण्याचा देखावा करणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात जंगलतोड, डोंगरांची तोडफोड आणि नद्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे धोरण स्वीकारले असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. पर्यावरण संवर्धनाबाबत सरकारची भूमिका आणि प्रत्यक्षातील कृती यामध्ये मोठी दरी असल्याचा आरोप करत त्यांनी पर्यावरणविषयक धोरणांवर पुनर्विचार करण्याची मागणी केली.
दरम्यान, याआधी आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन गडचिरोली गडचिरोलीतील व्याघ्र कॉरिडॉरची व्याप्ती कमी करून खाणींना परवानगी देण्यासंदर्भात जोरदार टीका केली होती. ‘मोकळे भूखंड बिल्डरांना देणारे महायुती सरकार आता जंगलेही लाडक्या कॉण्ट्रक्टरच्या घशात घालत आहे’, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच हा प्रकल्प रद्द करावा आणि त्याला परवानगी देणाऱया प्रधान मुख्य वनसंरक्षकांना बडतर्फ करावे, अशी मागणी त्यांनी केली होती.



























































