
देशभरात रोख रक्कम अर्थात कॅशचा प्रचंड तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. देशात अनेक भागांत असलेल्या एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांना एटीएममधून पैसे काढता येत नाहीत. एटीएममध्ये जमा करण्यासाठी बँकांकडून पुरेशी रोकड उपलब्ध करून दिली जात नसल्याने हे संकट ओढवले आहे. याची गंभीर दखल घेत एटीएम क्षेत्रातील शिखर संस्था पॅटमीने चिंता व्यक्त करत इंडियन बँक असोसिएशनला (आयबीए) पत्र लिहून तत्काळ मदत करा, अशी विनंती केली आहे.
ग्राहकांसाठी लागणारी रोकड आणि बँकांकडून प्रत्यक्षात मिळणारा पुरवठा यामध्ये प्रचंड तफावत निर्माण झाली आहे. मार्च महिन्यात 94 हजार कोटी रुपयांची गरज असताना बँकांकडून केवळ 61 हजार कोटी रुपये म्हणजेच केवळ 64 टक्के रक्कम मिळाली आहे. एप्रिल महिन्यातसुद्धा अशीच परिस्थिती होती. 94 हजार कोटी रुपयांऐवजी केवळ 54 हजार कोटी रुपये म्हणजेच केवळ 57 टक्के रक्कम एटीएममध्ये जमा करण्यात आली होती. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीची रीतसर माहिती आरबीआयच्या चलन व्यवस्थापन विभागालाही देण्यात आली आहे.
पाच राज्यांत एटीएम सेवा विस्कळीत
कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या पाच राज्यांत एटीएम सेवा विस्कळीत झाली आहे. कर्नाटकात केवळ रोख रक्कम 36 टक्के उपलब्ध आहे. आंध्र प्रदेशात 39 टक्के, तेलंगणात 41 टक्के, मिझोराममध्ये 41 टक्के, अरुणाचल प्रदेशात 48 टक्के रोख रक्कम एटीएममध्ये उपलब्ध आहे.
वाढत्या शुल्कामुळे ग्राहकांची पाठ
एटीएम वापरण्याच्या शुल्कात वाढ झाली आहे. 21 रुपयांवरून 23 रुपये झाले आहे. गेल्या वर्षी 49.84 कोटी एटीएममधून काढण्यात आले होते. एकूण व्यवहारांचे मूल्यही 2.64 लाख कोटींवरून 2.5 लाख कोटी रुपयांवर आले आहे. वाढत्या शुल्कामुळे ग्राहकांनी एटीएमकडे पाठ फिरवली आहे.
बँकांना एटीएमचा खर्च परवडेना
अनेक बँकांना एटीएमचा खर्च परवडेनासा झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने कॅश व्हॅनद्वारे एटीएमपर्यंत पैसे पोहोचवण्याचा खर्च वाढला आहे. एटीएम सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बोजा वाढला आहे. ऑपरेशनलचा खर्च पाहता ही रक्कम तुटपुंजी ठरत आहे.




























































