
राजेश एक्सपोर्टस् लिमिटेडने जो घोटाळा केला आहे, त्यांच्या या घोटाळ्यामुळे गुंतवणूकदारांचे 25 हजार कोटी रुपये बुडाले आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला आहे.
देशातील जनता 15 लाख रुपये खात्यात येण्याची वाट पाहत राहिली, परंतु नरेंद्र मोदी यांचे मित्र असलेल्या राजेशभाईंनी 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. मेहुल चोक्सी, विजय माल्या, नीरव मोदी, ललित मोदी आणि राजेशभाई यांचा उल्लेख करत ही भाऊबंधकी देशाला महागात पडत आहे अशी जोरदार टीका पवन खेरा यांनी केली. सेबीने राजेश एक्सपोर्टस् आणि त्याच्या प्रवर्तकांवर मोठय़ा प्रमाणात आर्थिक फसवणूक व निधीच्या अपहाराचे आरोप केले आहेत. मात्र या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यासाठी सेबीला तब्बल सात महिने वाट पाहावी लागली. एलआयसी गुंतवणुकीचा मुद्दाही उपस्थित केला. 2016 मध्ये एलआयसीकडे राजेश एक्सपोर्टस्मधील 1.99 टक्के हिस्सा होता. मात्र 31 मार्च 2026 पर्यंत हा हिस्सा वाढून 10.80 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. फेब्रुवारी 2023 राजेशभाई एक्सपोर्टस्चे बाजारमूल्य 28 हजार कोटी रुपये होते. मात्र 5 जून 2025 रोजी ते घसरून केवळ 3 हजार कोटी रुपये राहिले आहे. यामुळे देशातील गुंतवणूकदारांचे 25 हजार कोटी रुपये बुडाल्याचा दावा खेरा यांनी केला आहे.




























































