नेस्को ड्रग्ज प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन सरकारचा आरोपींच्या जामिनाला विरोध, ९ जूनला हायकोर्टात पुन्हा सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगावच्या नेस्को संकुलातील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी अटक आरोपींनी दाखल केलेल्या जामीन अर्जाला राज्य सरकारने आज जोरदार विरोध केला. अमेरिका, जर्मनी येथून अमली पदार्थाच्या गोळ्या मुंबईत आणण्यात आल्या असून आंतरराष्ट्रीय स्तरावर हे रॅकेट पसरले आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरू असून याचिकाकर्त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला.

नेस्को सेंटरमध्ये ११ एप्रिल रोजी आयोजित डीजे कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वनराई पोलिसांनी सदोष मनुष्यवध, अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून विहान ऊर्फ आकाश समळ, सनी जैन, रौनक खंडेलवाल, बालकृष्णन कुरूप, प्रतीक पांडे, आनंद पटेल, विनीत गेरेलानी, शुभ अग्रवाल, आयुष साहित्य, प्रदीप गुप्ता आणि जिया जेकब या अकरा जणांना अटक केली. त्यातील आकाश समळ याला जामीन मिळाला. यापाठोपाठ लाईव्ह इव्हेंट्सचे बाळकृष्ण कुरूप आणि सनी जैन यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज शुक्रवारी सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती शाम चांडक यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत या प्रकरणाची सुनावणी ९ जून रोजी ठेवली. आरोपींच्या वतीने ज्येष्ठ वकील गिरीश गोडबोले यांनी युक्तिवाद केला.