
विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जगज्जेता डी. गुकेश यांनाही जी गोष्ट जमली नाही ती हिंदुस्थानचा युवा ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंदने करून दाखवली. त्याने प्रतिष्ठsच्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. अवघ्या 20 वर्षांच्या प्रज्ञानंदने ही स्पर्धा जिंकणारा पहिला हिंदुस्थानी खेळाडू होण्याचा मान मिळवला.
अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसनला या स्पर्धेत दोनदा हरविण्याचा भीमपराक्रम प्रज्ञानंदने केला होता. अंतिम फेरीत त्याने जर्मनीच्या व्हिंसेट किमरचा पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी तो 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, निर्णायक क्लासिकल लढतीत विजय मिळवत त्याने तीन गुणांची कमाई केली आणि एकूण 18 गुणांसह जेतेपद आपल्या नावावर केले. या स्पर्धेत डी. गुकेश 8 गुणांसह अखेरच्या स्थानावर राहिला.



























































