बेस्टचे कर्मचारीही संपावर जाणार, तब्बल 12 संघटना एकवटल्या; कृती समितीचा आज मेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रमाच्या परिवहन आणि विद्युत विभागातील कामगारांचे प्रश्न तसेच विविध मागण्यांची सरकारकडून दखल घेतली गेलेली नाही. वारंवार दाद मागूनही महायुती सरकार ढिम्म असल्याने अखेर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याची तयारी केली आहे. यासाठी बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या तब्बल 12 संघटना एकवटल्या असून त्यांच्या कृती समितीचा सोमवारी मेळावा होणार आहे.

बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती बिकट आहे. स्वमालकीच्या बसचा ताफा नगण्य उरलेल्या बेस्टचे कर्मचारी विविध समस्यांना तोंड देत आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक देयकांचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. याबाबत सरकारदरबारी वारंवार आवाज उठवण्यात आला. मात्र महायुती सरकारने आश्वासनापलीकडे काहीही ठोस केले नाही. त्याच नाराजीतून अखेर 12 संघटनांच्या कृती समितीने बेमुदत संपाचे शस्त्र उपसण्याची तयारी केली आहे. शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेसह अन्य संघटना कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक भूमिकेत आहेत. आंदोलनाची रणनिती ठरवण्यासाठी येत्या सोमवारी सायंकाळी दादरमध्ये कृती समितीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बेमुदत संपाबाबत निर्णायक भूमिका घेण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचारी संपावर गेल्यास लाखो मुंबईकरांचे हाल होणार आहेत.

भाजपच्या संघटना दूर

सत्तेत येण्यापूर्वी कामगारांना मोठमोठी स्वप्ने दाखवणाऱ्या भाजपने कामगारांचा अपेक्षाभंग केला आहे. त्यामुळे भाजपविरोधात कामगारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. न्याय्य हक्कांसाठी कामगारांच्या 12 संघटनांनी एकजुटीने लढण्याचा निर्धार केला असताना भाजपच्या संघटना दूर राहिल्या आहेत.

आरटीओ कर्मचाऱ्यांचा उद्या लाक्षणिक संप; 16 जूनपासून बेमुदत संपावर जाणार

आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेली चौथी बैठकही निष्फळ ठरली. त्यामुळे आरटीओ कर्मचारी संघटना संपाच्या भूमिकेवर ठाम राहिली आहे. त्यानुसार मंगळवार, 9 जूनला राज्यव्यापी लाक्षणिक संप आणि 16 जूनपासून बेमुदत संप करण्यात येणार आहे. परिवहन मंत्र्यांच्या वारंवार सूचनांनंतरही आरटीओ प्रशासन विभागातील अधिकारी निर्णय घेण्यास तयार नसल्याने आंदोलन तीव्र करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे आरटीओ कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी स्पष्ट केले.