
दापोली, मंडणगड, खेड आगाराला प्राप्त झालेल्या नवीन जिजाऊ प्रकारातील बसेस सलग दुसऱ्यांदा रत्नागिरी विभागात अन्य आगारांना वळविण्यात आल्या असल्याने एसटी प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारात राजकीय हस्तक्षेप असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून दापोली, मंडणगड, खेड तालुक्यांमध्ये प्रवासी वर्ग नाही का? असा सवाल आता विचारला जात आहे.
काही महिन्यांपूर्वा परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी 55 आसन क्षमतेच्या जिजाऊ बसेस या एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये समाविष्ट केल्या होत्या. या बसेस प्रत्येक आगाराला देण्यात येणार होत्या. त्याप्रमाणे रत्नागिरी विभागाने 170 बसेसची मागणी नोंदवली होती. त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वा दापोली, मंडणगड व खेड आगाराला या बसेस प्राप्त झाल्या होत्या. या बसेसवर रत्नागिरी विभागीय कार्यशाळेत डेपो मार्किंग देखील पडले होते. मात्र अचानक या बसेस रत्नागिरी आगाराला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रत्नागिरी आगार हे जिल्ह्यातील मोठे आगार असल्याने या प्रकाराबद्दल कोणीही तक्रार केली नाही. मात्र याचाच फायदा एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचलला असल्याचे दिसून येत आहे. कारण दोन दिवसापूर्वी दापोली, मंडणगड, खेड या आगारांना प्रत्येकी 5 बसेस आल्या होत्या. या बसेस आगारातून विविध मार्गावर सोडण्यात आल्या होत्या. मात्र अचानक सायंकाळी या बसेस तातडीने रत्नागिरी येथे मागवण्यात आल्या व अन्य आगारांकडे वर्ग करण्यात आल्या.
याबाबत एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता, त्यांनी दापोली, मंडणगड, खेड या आगारांना बसेस देण्यात आल्या नसल्याचे सांगत दापोली आगाराकडे सध्या ई-शिवाई प्रकारातील नव्या 24 बसेस असल्याने प्रवाशांची उत्तम सोय होत असल्याचे सांगितले. मात्र याबाबत एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता दापोली आगारातील 24 बसेस या ठाणे, बोरीवली, खेड व चिपळूण या मार्गावर धावत आहेत. अन्य मार्गांवर जाण्यासाठी असलेल्या बसेस या तुलनेने जुन्या असल्याचे सांगण्यात आले.
या संपूर्ण प्रकाराबाबत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख श्री. ऋषिकेश गुजर म्हणाले की, दापोली, मंडणगड, खेड या आगारांना देण्यात आलेल्या बसेस या अन्य आगाराकडे वर्ग करण्याचा प्रकार हा अत्यंत चुकीचा आहे. या प्रकरणात एसटीचे अधिकारी हे कोणाच्या तरी दबावामुळे राजकारण करत असल्याचे दिसून येत असून आपण याबाबत परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार करणार आहोत.दापोली, मंडणगड, खेड या आगारांना बसेस प्राप्त झाल्या नव्हत्या तर या आगाराचे चालक हे कोणाच्या आदेशाने सदर बस आणण्यासाठी पुणे येथील कार्यशाळेत गेले होते. त्याचप्रमाणे एकीकडे परिवहन मंत्री डिझेल वाचवा असे सांगत असताना वरील तिन्ही आगारातून रिकाम्या बसेस सायंकाळी रत्नागिरीकडे का रवाना करण्यात आल्या. त्याचप्रमाणे या बसेसवर वरील आगाराचे डेपो मार्किंग पडले असताना पुन्हा या बसेस वरील आगारांना आल्या नाहीत असे का सांगण्यात येत आहे? असा सवाल आपला असून या प्रकाराबाबत रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक यांच्यावर डिझेलचा अपव्यय केल्याप्रकरणी तसेच चालकांना अतिरिक्त भत्ता देऊन एसटीचे नुकसान केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी आपली मागणी असून आपण याबाबत लवकरच पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दापोली आगारातून पाजपंढरी-मुंबई, उंबरघर-ठाणे, दाभोळ-बोरीवली, दाभोळ-नालासोपारा, भडवळे-नालासोपारा अशा विविध मार्गावर बसेसची मागणी असताना ई शिवाई बसेस केवळ दापोली आगारातून ठाणे, बोरीवली मार्गावर दापोलीतून सोडण्यात येत आहेत. त्यामुळे नवीन बसेस आल्या तर या मार्गावरील प्रवाशांची सोय होऊ शकते. मात्र एकीकडे प्रवाशी वाढवा असे सांगायचे व दुसरीकडे राजकारण करत प्रवाशांना सुविधा द्यायच्या नाहीत असा प्रकार रत्नागिरी विभागातील अधिकारी करत असून आपण याचीही तक्रार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.






























































