
भारताचा एक-एक नागरिक सरकारसाठी महत्त्वाचा आहे. मग तो जगात कोठेही असो. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे. आपल्या नागरिकांच्या मृत्यूमुळे इतर देशांतील लोक कसे हळहळतात व संतापून रस्त्यावर येतात ते भारतीयांनी पाश्चिमात्य देशांकडून शिकायला हवे. भारतीय खलाशांच्या मृत्यूने संताप झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, पण संताप तर कोठेच दिसत नाही! 12 वर्षांत मोदी व त्यांच्या लोकांनी भारतीयांच्या मनातील संतापाची थंड राख केली. त्यामुळे अमेरिकेच्या हल्ल्यात तीन खलाशी मेले काय किंवा पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 हिंदू पर्यटकांना मारले काय, सर्व कसे थंड थंडच असते.
पंतप्रधान मोदी यांचे भक्तमंडळ सध्या उत्सवात मग्न आहे. पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीस 12 वर्षे झाल्याचा हा उत्सव आहे. या उत्सवास अमेरिकेचे प्रे. ट्रम्प यांनी शुभेच्छा दिल्या. मोदी हे आपले मित्र असून ते शहाणे नेते आहेत, अशा भावना ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचे भक्तमंडळ सांगत आहेत. ते खरे असेलही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एक म्हण लोकप्रिय आहे, ‘म्हसोबाला नव्हती बायको आणि सटवाईला नव्हता नवरा’ म्हणून त्यांनी लग्न केले. अशी ती गावातली लोककथा असली तरी ट्रम्प-मोदी नात्यांबाबत ती घट्ट बसते. इथे मोदी आपले मित्र म्हणून कौतुक करायचे व त्या शुभेच्छांची शाई वाळण्याआधीच ओमानजवळच्या समुद्रातील भारतीय जहाजांवर अमेरिकेच्या सैन्याने हल्ले करायचे. ही कसली मैत्री? आतापर्यंत तीन भारतीय जहाजांवर अमेरिकेने हल्ले केले व त्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. भारतीय जहाजे इराणमधून तेल टँकर घेऊन निघाली असताना हे असे हल्ले झाले. भारतीय खलाशांना ओमानच्या नौसैनिकांनी वाचवले नसते तर शंभरावर खलाशी अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेले असते. या हल्ल्याबद्दल मोदींच्या नव्या भारताची प्रतिक्रिया काय? तर म्हणे, भारताने अमेरिकेचा निषेध केला आहे! तीन निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. तेलाने भरलेले टँकर उडवले व आम्ही फक्त निषेध करून कर्तव्य बजावले. अमेरिकेने समुद्री नाकाबंदी केली व ही नाकाबंदी तोडून भारतीय जहाजे पुढे जात होती. जहाजांवर भारताचा तिरंगा फडकत होता, तरीही अमेरिकी सैन्याने या
जहाजांवर हल्ला
केला. याचा अर्थ असा की, पंतप्रधान मोदी हे ‘विश्वगुरू’ आहेत हे अमेरिकी सैन्याला माहीत नाही व प्रे. ट्रम्प हे मोदींना, भारताला मित्र मानतात हे त्या अमेरिकन सैन्याच्या खिजगणतीत नाही. भारतीय जहाजांवर नाहक हल्ला करून अमेरिकेने युद्ध अपराध केला आहे. जे तीन भारतीय खलाशी मारले गेले, त्यातला आदित्य शर्मा हा फक्त 23 वर्षांचा होता. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. या तीन खलाशांच्या मृत्यूचे दुःख मोदी सरकारला, भारतीय जनता पक्षाला अजिबात झालेले नाही. ते ‘12 वर्षे’ पूर्ण झाल्याच्या आपल्याच उत्सवात मग्न आहेत व उत्सवास प्रे. ट्रम्प यांचे आशीर्वाद लाभले यावर खूश आहेत. भारतीय नागरिकांचे रक्षण करण्यास मोदी सरकार अपयशी ठरले आहे. ट्रम्प यांच्याबरोबर मोदींचे वैयक्तिक संबंध काय आहेत याच्याशी देशाला घेणेदेणे नाही. भारतीयांचे मृत्यू अमेरिकेच्या हल्ल्यात होत आहेत हा गंभीर प्रश्न आहे. या गंभीर विषयावर मोदी यांनी प्रे. ट्रम्प यांच्याशी थेट बोलायला हवे होते. भारतीय खलाशी म्हणजे समुद्रातील झुरळे नाहीत. कोणीही यावे व त्यांची हत्या करावी. तुमचे वैयक्तिक संबंध भारतीयांचे जीव वाचवण्यास कामी येत नसतील तर देशाने त्या संबंधांचे कौतुक का करावे? तुम्ही फक्त दिल्लीतील अमेरिकन दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱयांना बोलावून कागदी निषेधाच्या डरकाळ्या फोडणार असाल तर त्याने काय होणार आहे? स्वतःचा प्रचंड विध्वंस होत असूनही इराणसारखा देश
अमेरिकेच्या ‘अरे’ला
तत्काळ ‘कारे’ करून तोडीस तोड प्रतिहल्ले करीत आहे. स्वतःला प्रे. ट्रम्प यांचे ‘मित्र’ आणि ‘विश्वगुरू’ म्हणविणारे मोदी मात्र तीन-तीन भारतीय खलाशांचा बळी घेणाऱ्या अमेरिकेविरोधात ‘ब्र’देखील काढत नाहीत. हेच मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी केरळजवळील समुद्रात झालेल्या दोन केरळी मच्छिमारांच्या हत्येवरून तत्कालीन यूपीए सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. या दोन मच्छिमारांना गोळ्या घालणारे इटालियन नौसैनिक भारतातील कोणत्या तुरुंगात आहेत, हे जनतेला जाणून घ्यायचे आहे, अशी टीका ते जाहीर सभांमधून करीत होते. मग आता मोदीजी, ओमानजवळील समुद्रात तीन भारतीय खलाशांचा जीव घेणाऱ्या अमेरिकन नौसैनिकांना तुमच्या सरकारने कोणत्या तुरुंगात डांबले आहे? भारतातील जनतेला हे जाणून घ्यायचे आहे. मात्र तेव्हा शिरा ताणून प्रश्न विचारणारे आज उत्तर देण्यापासून पळ काढीत आहेत. भारताचा एक-एक नागरिक सरकारसाठी महत्त्वाचा आहे. मग तो जगात कोठेही असो. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे. आपल्या नागरिकांच्या मृत्यूमुळे इतर देशांतील लोक कसे हळहळतात व संतापून रस्त्यावर येतात ते भारतीयांनी पाश्चिमात्य देशांकडून शिकायला हवे. भारतीय खलाशांच्या मृत्यूने संताप झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, पण संताप तर कोठेच दिसत नाही! 12 वर्षांत मोदी व त्यांच्या लोकांनी भारतीयांच्या मनातील संतापाची थंड राख केली. त्यामुळे अमेरिकेच्या हल्ल्यात तीन खलाशी मेले काय किंवा पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 हिंदू पर्यटकांना मारले काय, सर्व कसे थंड थंडच असते.































































