
>>विनायक
टॅबवर शिकण्याच्या, लिहिण्या-वाचण्याच्या आणि किंडल किंवा अन्य ‘गॅझेट’वर ग्रंथसंचय करण्याच्या काळात ‘पाटी-पेन्सिल’ विषय कुठून सुचला? ही कल्पना आता ‘आऊटडेटेड’ होतेय असं म्हटलं जातं. बदलत्या काळात सगळंच ‘चॅटजीपीटी’सारख्या ‘गॅझेट’च्या माध्यमातून ‘शिकता’ येऊ लागलं तर ‘शिकवण्या’ची तरी किती गरज उरेल? ‘सेल्फ लर्निंग’कडे जग जाईल काय आणि याचे बरे-वाईट परिणाम काय होतील? असे आधुनिक विज्ञानाच्या वापरकर्त्यांना पडलेले प्रश्न कानावर येतात. अनेकदा त्याबाबत पुढच्या पिढय़ांशी चर्चाही होते. ‘एआय’च्या संभाव्य सर्वंकष ‘क्रांती’विषयी केव्हातरी माहिती घेऊच.
परंतु आजची गोष्ट थोडी आधीची. हल्लीच्या भाषेत ‘बेबी बूमर’ पिढीची. हा काळ 1946 ते 1964 असा ठरवला जातो. हे ‘जनरेशन’चे कालावधी हासुद्धा वेगळ्याच लेखाचा विषय आहे, पण आमची पिढी या ‘बेबी बूमर’ काळातली. खरे तर आमच्या बालपणीचा काळ म्हणजे मध्ययुगातील अनेक प्रथा-परंपरांसकटच्या जीवनपद्धतीचा सरता काळ. त्या वेळी विमानांपर्यंत प्रगती झाली असली तरी महावेगवान ‘स्पेस’ युग अवतरायचं होतं. एखादा स्पुटनिक अवकाशात गेल्याचा अचंबा होता, परंतु ‘कॉम्प्युटर क्रांती’ खूप दूर होती. ‘कॉन्कॉर्ड’सारख्या वेगवान विमानाचं काwतुक कॉलेजमधल्या अभ्यासक्रमात वाचायला मिळत होते.
इथल्या इंग्रजी अमदानीत ‘स्लेट’ किंवा दगडी पाटी शालेय अभ्यासाच्या सुरुवातीला महत्त्वाची ठरली. त्यापूर्वी मुळाक्षरं धूळपाटीवर लिहिली जात. ती धुळाक्षरं होती. मात्र तात्पुरतं लिहिलेलं त्वरित पुसता येईल (डिलिट करता येईल) अशी ‘सोय’ त्यात होती, पण धूळपाटय़ांसाठी ‘धूळ’ गरजेची आणि त्या आकाराने मोठ्या म्हणजे फळ्यासारख्या विद्यार्थ्यांनी सहज ‘दफ्तरा’तून नेण्यासारख्या नव्हेत. मग आल्या दगडी, सिंगल आणि ‘डबल’ पाटय़ा! आम्ही इयत्ता चौथीपर्यंत त्याच वापरल्या. सर्व विषय त्यावर शिकायचे, लक्षात ठेवायचे आणि पुसायचे. आवश्यक तिथे पाठांतर. ही परंपरा तर अक्षर शोधाचाही पूर्वीची. साहित्यातल्या कविता, वैज्ञानिक, गणिती सूत्रे, व्याकरणाचे नियम पाठ करून घेतले जायचे. या घोकमपट्टीवरही नंतर खूप वाद-चर्चा झाल्या. निव्वळ पाठांतरापेक्षा ‘आकलन’ महत्त्वाचं हे खरंच, पण पाठांतराने काही ‘डेटा’ मेंदूत ‘स्टोअर’ करून अर्थघटनासाठी कुणालाही विचारता यायचं हेसुद्धा खरं.
….तर या पाटी-पेन्सिलीचा आरंभ कधी झाला? नावाप्रमाणेच ‘स्लेट’ पाटी ही स्लेट दगडापासून बनवली जायची. आजही बनवली जात असेल. हा ‘पाटी’चा दगड पृथ्वीवर हजारो वर्षांच्या प्रक्रियेतून नैसर्गिकरीत्या तयार होतो. चिकट चिखल आणि गाळाच्या (सेडिमेंटरी) खडकापासून या ‘स्लेट’ दगडाची निर्मिती होते. त्यामध्ये ज्वालामुखीजन्य राखेचाही (व्हॉल्पॅनिक अॅश) समावेश असतो.
हा गुळगुळीत पापुद्रेदार दगड (किंवा फॉलिएशन) एकावर एक अशा पातळ थरांमध्ये घट्ट होतो. मात्र हे थर ‘क्लिव्हेज’ किंवा विदलन’ पद्धतीने परस्परांपासून वेगळे होऊ शकतात. त्याचे मोठमोठे पापुद्रे आणखी पातळ (थिन) करून त्याचे लिखाणाच्या ‘पाटी’साठी योग्य तुकडे बनवून लाकडी चौकटीत अडकवले जातात. त्यावर घट्ट चुनखडीच्या ‘पेन्सिल’ने लिहिता, वाचता, पुसता येतं. सध्या एखादी गोष्ट मोबाईलच्या ‘मेमरी’त नोंदवण्याची ‘सोप्पी’ पद्धत आहे. आम्ही पाटीवरची अक्षरं अर्थासह मेंदूच्या ‘मेमरी’त स्टोअर करून पाटी कोरी करायचो. असाच अभ्यास पुनः पुन्हा चालायचा. वही, पेन वगैरे गोष्टी चौथीपासून असायच्या. प्रत्येकाकडची स्लेट पाटी हा काwतुकाचा आणि जपून ठेवण्याचा विषय होता.
दगडी (स्लेट) पाटीवर लिहिण्याची पद्धत आपल्या देशात साधारणपणे अकराव्या शतकापासून होती. कारण अल्बेरुनीच्या ‘तारीख-ए-हिंद’मध्ये त्याचा उल्लेख आढळतो. युरोपात लिहिण्याची पाटी सतराव्या शतकात आली असावी. शालेय पाटीचे अनेक प्रकार असायचे. काही पाटय़ांवर गणिती आकडेमोड किंवा पाढे (टेबल्स) लिहिण्यासाठी आधीच खाचांच्या रेषा आखलेल्या असत. उत्तम स्लेट दगडाची पाटी काळीशार आणि महाग असायची. त्याशिवाय शाळेत त्यावर केलेली महत्त्वाची नोंद ‘गृहपाठा’साठी पुसून न जाता घरी आणता यावी म्हणून कित्येक जण दोन पाटय़ा जोडलेली ‘डबल’पाटी वापरत ते थोडं तथाकथित ‘प्रतिष्ठs’चं मानलं जायचं.
अर्थात स्लेट दगडाच्या खाणीत काम करणाऱ्यांना त्याच्या सूक्ष्म कणांनी फुप्फुसांचे विकारही जडायचे. काही ठिकाणी यात बालमजुरीची कुप्रथाही होती. शिवाय या पाटय़ा कधीतरी फुटायच्या. ‘शाळा सुटली, पाटी फुटली’ असं एक गंमत गीतही त्या वेळी होतं. नंतरच्या काळात दगडी (स्लेट) पाटीला काळ्या लोखंडी पत्र्याच्या पाटय़ांचा पर्याय आला. त्या पाटय़ा रंग उडाल्यावर गंजून घातक ठरू शकत असतं. प्लॅस्टिकचं युग आल्यावर प्लॅस्टिकच्या पाटय़ा आल्या. पाटय़ाप्रमाणे पेन्सिलीमध्येही क्रांती (किंवा उत्क्रांती) होत ‘जेली’चा उपयोग करून प्लॅस्टिक पाटीवर लिहिता, पुसता येणाऱ्या पेन्सिलींचा जमाना आला. आता ‘टॅब’ हाती येताच सर्वच बदललं, पण शालेय शिक्षण वर्षाच्या आरंभी त्या जुन्या शिक्षण पद्धतीची आठवण आली. आता या स्मरणाने नव्या शहरी पिढीला गंमत वाटेल आणि दूर खेडय़ात कुठेतरी पाटीही स्वच्छ लिहिली, पुसली जात असेल! माध्यम कोणतं का असेना, शिक्षणाचा ओणामा (आरंभ) महत्त्वाचा!





























































