
आंबोली घाटातील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी रविवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास अचानक दोन भलेमोठे दगड कोसळले. मुख्य धबधब्यापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर ही घटना घडली. एक दगड रस्त्यावरून घरंगळत खाली दरीत कोसळला. त्यामुळे घाटातील संरक्षक कठडा आणि रेलिंग पूर्णपणे तुटली आहे, तर दुसऱया मोठय़ा दगडाचे तुकडे होऊन ते रस्त्यावरच विखुरले. सुदैवाने घटनेच्या वेळी रस्त्यावरून कोणतेही वाहन जात नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या आंबोली घाटात पावसाळी पर्यटनाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच दरड कोसळल्याने वाहन चालक आणि पर्यटकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. दगड रस्त्याच्या मधोमध थांबल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवण्याचे काम केले. तोपर्यंत आंबोली घाटातून एकेरी वाहतूक सुरू होती.
संरक्षक कठडा तुटल्यामुळे ऐन पावसाच्या दिवसांत आता वाहनांसाठी तीव्र धोका निर्माण झाला आहे. आंबोलीचा पावसाळी पर्यटन हंगाम आता कुठे सुरू होत आहे. त्यापूर्वीच घाटात दगड कोसळल्याची घटना घडल्याने या मार्गावरून प्रवास करणारे धास्तावले आहेत.
अजूनही धोका कायम
घाटाच्या माथ्यावर अजूनही असे अनेक मोठे दगड सैल अवस्थेत अडकलेले आहेत, जे कधीही खाली रस्त्यावर येऊ शकतात. त्यामुळे अजूनही धोका कायम आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन घाटमाथ्यावरील धोकादायक ठरू शकणारे सैल दगड आधीच बाजूला करावेत आणि रस्त्यावरील दगड हटवून वाहतूक सुरक्षित करावी. तसेच संभाव्य धोका टाळण्यासाठी वन विभागाने तत्काळ याची दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.





























































