
पेट्रोल–डिझेलच्या दरवाढीने संपूर्ण देश चिंतेत असतानाच रविवारी केंद्र सरकारने 100 टक्के इथेनॉल इंधन वापरण्यास मंजुरी दिली. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हा निर्णय जाहीर केला. 100 टक्के इथेनॉल इंधनाच्या कायदेशीर वापरासंबंधी फाईल्सवर स्वाक्षरी केली असून देशात दीड महिन्यातच नव्या कार येतील, असे ते म्हणाले.
आखाती देशातील युद्धाच्या परिस्थितीमुळे हिंदुस्थानात इंधनटंचाईचे संकट उभे ठाकले. परिणामी, लागोपाठ इंधन दरवाढीचे चटके देशातील जनतेला सहन करावे लागते आहेत. याचदरम्यान सरकारने पर्यायी इंधनाच्या उपलब्धतेसाठी मोठे पाऊल टाकले आहे. देशात 100 टक्के शुद्ध इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाशी संबंधित नियम आणि नियमावलीला अंतिम रूप देणाऱया फाईलवर स्वाक्षरी केली आहे. देशाचे कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे तसेच वाहतूक क्षेत्रातून होणारे प्रदूषण रोखणे हा यामागील मुख्य हेतू आहे, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले.
अनेक कंपन्या नव्या गाड्या बाजारात आणणार
‘ई-100’ धोरणाच्या मंजुरीची घोषणा करतानाच केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नव्या कारबाबत माहिती दिली. देशातील ऑटोमोबाईल क्षेत्राने 100 टक्के इथेनॉल इंधनाचा बदल स्वीकारला आहे. त्याच अनुषंगाने अनेक मोठय़ा कंपन्या 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱया गाडय़ा बाजारात आणण्यासाठी तयार आहेत. टोयोटा, सुझुकी, एमजी आणि ह्युंदाईसह इतर कंपन्या दीड महिन्यात नवीन गाडय़ा बाजारात लाँच करतील, असे गडकरींनी स्पष्ट केले.
तिजोरीवरचा भार कमी होईल
100 टक्के इथेनॉल इंधन हा पेट्रोलच्या तुलनेत खूप स्वस्त पर्याय आहे. हिंदुस्थान आपल्या गरजेचा मोठा भाग परदेशातून कच्चे तेल आयात करून पूर्ण करतो. त्यामुळे सद्यस्थितीत देशाच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत आहे. 100 टक्के इथेनॉल इंधनाच्या वापरामुळे सामान्य जनतेला महागडय़ा पेट्रोलपासून दिलासा मिळण्याबरोबरच देशाचे इंधन आयात बिल कमी होईल आणि पर्यायाने तिजोरीवरील भार कमी होईल, असे गडकरींनी नमूद केले.





























































