
दहिसर-बोरिवलीचा भाजपचा वॉर्ड अध्यक्ष सूरज प्रतापसिंह देवडा हा बारमधील अविवाहित मुलींचे लैंगिक शोषण करीत असल्याचे व भाजप आमदार मनीषाताई चौधरी यांच्या नावाने बारमधील तरुणींना आपल्याकडील ‘गन’ दाखवून धमक्या देत असल्याचे तक्रारीत उघड झाल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपविला.
सूरज देवडा हा विवाहित आहे. तरीही त्याने बोरिवली (पूर्व) येथील एका हॉटेलमधील एका मुलीला आपण अविवाहित असल्याचे सांगून पहिल्याच भेटीत बारमध्ये त्या मुलीवर 50 हजारांच्या नोटा उडविल्या. मध्य प्रदेशातील त्या 23 वर्षीय तरुणीचा तो पहिलाच दिवस होता. बारमध्ये जाऊन अविवाहित मुलींचा शोध घेऊन त्यांच्यावर पैसे उडविणाऱ्या भाजप वॉर्ड अध्यक्षाने त्या मुलीचा मोबाईल क्रमांक मागितला. तिने तो दिला. तेव्हापासून सूरज प्रतापसिंहने त्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिच्याकडून काही लाख रुपये उकळले, परंतु सूरज देवडाने काही त्या मुलीशी लग्न केले नाही. उलट आमदार मनीषाताई चौधरी यांच्या नावाने सूरज प्रतापसिंह त्या मुलीला धमकावू लागला. त्याच्याकडील गन तिला दाखवू लागला. त्यामुळे ती मुलगी घाबरली. तिने पोलिसांकडे धाव घेतली व माझ्यासह अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार केली. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी याची गंभीर दखल घेऊन तपास मुंबई गुन्हे शाखेकडे नोंदविला आहे.
बारमध्ये जाऊन पैसे उडविणाऱया भाजप वॉर्ड अध्यक्षाचे हे प्रकरण गंभीर असून पक्षाने या स्त्रीलंपट पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पक्षातील कार्यकर्तेच करीत आहेत.





























































