
उन्हाळ्याच्या मोठय़ा सुट्टीनंतर अखेर येत्या सोमवारी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ व अन्य काही भाग वगळता संपूर्ण राज्यभरातील शाळांमध्ये मुलांचा किलबिलाट सुरू होणार आहे. ग्रामीण भागाप्रमाणे मुंबई शहर व उपनगरांतील शाळा, तेथील शिक्षक लहान मुलांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. अनेक शाळांनी विशेष सजावट केली असून शाळांचा परिसर पुन्हा बच्चे कंपनीचा किलबिलाट अन् त्यांच्या उत्साहाने गजबजणार आहे. शाळेचा पहिला दिवस आठवणीच्या कप्प्यात साठवून ठेवताना लहानग्यांना पावसात भिजण्याची मज्जा मात्र ‘मिस’ करावी लागणार आहे.
मुलांची वार्षिक परिक्षा संपली की शाळांना उन्हाळी सुट्टी पडते. परीक्षांचे टेन्शनच उरलेले नसते. ही सुट्टी शालेय जीवनातील ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहिकडे’ या बालकवींच्या ओळींप्रमाणे दरवर्षी नव्याने आनंद देते. सुट्टीत मामाच्या गावचा रस्ता धरणाऱ्या बच्चे कंपनींना अखेर येत्या सोमवारपासून शाळेचा रोजचा दिनक्रम पाळावा लागणार आहे. शहरातील बहुतांश शाळांमध्ये मुलांच्या स्वागताची विशेष तयारी करण्यात आली आहे.
दादरमध्ये खरेदीसाठी गर्दी
सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने रविवारी आदल्या दिवशी शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. दादर, लालबाग, अंधेरी, बोरिवली, मुलुंड, घाटकोपर येथील मार्केटमध्ये दप्तर तसेच अन्य शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पालक व मुलांनी हजेरी लावली होती. यंदा शैक्षणिक साहित्यालाही महागाईची झळ बसली आहे. अनेक वस्तूंचे दर वाढल्याचे काही पालकांनी सांगितले.
नवीन गणवेश, नवीन दप्तर
शाळांच्या पहिल्या दिवशी नवीन गणवेश, पाठीवर नवीन दप्तर अन् नवीन पुस्तके हाताळायला मिळणार आहेत. त्यामुळे लहान मुलांमध्ये नवचैतन्य आणि उत्सुकता आहे. सुट्टीनंतर वर्गमित्र-मैत्रिणी भेटणार असल्याने शाळेची प्रचंड ओढ लागली आहे, अशी प्रतिक्रिया विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयातील विद्यार्थी विहान कांबळी याने दिली.
























































