Parbhani news – दोन सख्ख्या बहिणींसह काकूचा गोदावरीत बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील मोहळा गावाजवळील गोदावरी नदीपात्रात रविवारी सकाळी आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींसह त्यांच्या काकूचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मोहळा येथील शेतकरी उत्तम देवीदास जाधव यांच्या उत्कर्षा जाधव (१८) व समीक्षा जाधव (१६) या दोन्ही बहिणी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास काकू सिंधू दत्ता जाधव (४५) यांच्यासोबत गोदावरी नदीकाठी आंघोळीसाठी गेल्या होत्या. आंघोळीदरम्यान नदीच्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही बहिणी पाण्यात बुडू लागल्या. त्यांना वाचविण्यासाठी सिंधू जाधव यांनी तत्काळ नदीत उडी घेतली. मात्र नदीतील खोल पाणी आणि प्रवाहामुळे त्यांनाही बाहेर येणे शक्य झाले नाही. परिणामी तिघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आणि तिघींचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, सोनपेठ येथे नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांत राठोड यांनी शवविच्छेदन केले. घटनास्थळी सोनपेठ पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. दौलत जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.