केडीएमसीचे ‘बार बचाव’ ! धोकादायक इमारतीवरील कारवाईस टाळाटाळ; एफडीए, उत्पादन शुल्क विभाग, पालिका अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुभाष रोड येथील बेकायदा आकाश (गौरव) बार वाचवण्यासाठी केडीएमसीचे अधिकारी धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यास सपशेल टाळाटाळ करत आहेत. या इमारतीमधील 27 रहिवासी बेघर झाले असतानाही बार वाचवण्याचा आटापिटा का, असा संतप्त सवाल करण्यात आला आहे. बार चालू ठेवल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता खुद्द उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त करूनही महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी व ‘बार बचाव’मुळे येत्या पावसाळ्यात काही बरे वाईट घडले तर त्यास जबाबदार कोण, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

डोंबिवलीतील भाऊराव सदन ही तळ अधिक चार मजल्यांची इमारत धोकादायक झाल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने थातूरमातूर कारवाई केली. सर्व मजले पाडण्याऐवजी फक्त तीन मजले जमीनदोस्त केले. मात्र तळमजल्यावर असलेला आकाश बार व श्रीकृष्ण व्हेज रेस्टॉरंट तसेच ठेवले. याबाबतचे वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध होताच उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवलीतील निरीक्षकांनी बारचा परवाना सुरू ठेवला तर दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे ठाण्यातील अधीक्षकांना लेखी कळवले. पण केडीएमसीच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्राने अजूनही बेकायदेशीरपणे सुरू असलेला बार जमीनदोस्त केला नाही, असा आरोप रहिवासी रखमा पोखरकर व विजय भोईर यांनी केला आहे.

अर्धवट पडलेल्या धोकादायक इमारतीमधील आकाश बारमुळे आजूबाजूच्या नागरिकांनाही प्रचंड त्रास होत आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी 31 मार्च रोजी बारमध्ये जाऊन तेथील तपासणी केली. त्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायदेंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त प्र. म. देशमुख यांनी लेखी कळवले. त्यास तीन महिने उलटले तरी हॉटेलचा परवाना अजून रद्द झालेला नाही. दरम्यान भाऊराव सदन रहिवासी संघाच्या सदस्यांनी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. तसेच लेखी निवेदनदेखील दिले. मुंढे यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.

तुकाराम मुंढे यांनी दखल घेऊनही अधिकाऱ्यांची बेफिकिरी

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धोकादायक इमारतीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या आकाश बारची दखल घेतली असली तरी ठाण्यातील अधिकारी मात्र बेफिकीर आहेत. इमारत धोकादायक असल्याचे पुरावे रहिवाशांनी सहाय्यक आयुक्त देशमुख यांना दिले आहेत. तरीदेखील याबाबतचा अहवाल केडीएमसीने आम्हाला दिला तरच अन्न व सुरक्षा विभागाने दिलेला परवाना रद्द करू, असे त्यांचे म्हणणे आहे. केडीएमसीचे अधिकारी मात्र आम्ही असा अहवाल देऊ शकणार नाही, असे सांगत हात झटकत असल्याचे विजय भोईर यांनी सांगितले. या टोलवाटोलवीमुळे मात्र आकाश बार बेकायदेशीरपणे सुरूच असल्याचे दिसून आले आहे.