
>> वर्णिका काकडे
हळबी बोली ही हलबा लोकांची बोली. मराठी, ओडिया व छत्तीसगढी यांच्या मिश्रणाने बनलेली ही बोली जिचा अंतर्भाव मराठीच्या प्रमुख बोलींमध्ये केला जातो. महाराष्ट्रातील चंद्रपूर (चांदा), गोंदिया, भंडारा, अचलपूरचा टापू मध्य प्रदेशातील बस्तर, कांकेर, रायपूर तसेच छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, ओडिशा या भागांत ही बोली प्रचलित आहे. भौगोलिक स्थानामुळे वऱहाडी-नागपुरीप्रमाणे या बोलीच्या शब्दांवर छत्तीसगढी हिंदी व ओडियाचा पगडा अधिक आहे. मात्र या बोलीची प्रत्ययप्रक्रिया मराठीच्या धर्तीवर आहे. व्याकरणदृष्टय़ा विचार केल्यास हळबीला हिंदीची बोली असे न म्हणता मराठीची बोली म्हणावी लागते, असे भाषाशास्त्रज्ञांचे मत आहे. त्याबद्दल मतभेदाला वाव मिळावा, असे तिचे स्वरूप आहे.
अहिराणी, गोंडी यांच्या संदर्भातही अशीच स्थिती दिसते. प्रमाण मराठीपेक्षा त्यांचे शब्द, उच्चार-प्रक्रिया व व्याकरणिक रूपसिद्धी यांमध्ये येणारा फरक हा त्यांच्या मूळ भाषेतून किंवा मूळ भाषा व मराठी यांच्या संमिश्रणातून आलेला असावा.
ही बोली सुमारे 7 लाखाहून अधिक लोकांकडून बोलली जाते. हळबी भाषेला कोणतीही स्वतची प्रमाणित लिपी नाही, परंतु ती प्रामुख्याने देवनागरी आणि ओडिया लिपीत लिहिली जाते. ही भाषा मुख्यत्वे ‘हलबा’ (किंवा हलबी) समाजाची मातृभाषा असून, विविध मौखिक परंपरा, लोकगीते आणि स्थानिक व्यवहारात तिचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो.
‘मी देखलो नाही’ यासारख्या हळबीतील वाक्यात ‘देख’ हिंदी व ‘लो’ हा मराठी प्रत्यय अशी वेगळी रचना आढळते. तरी तिच्यावरील मराठीचा प्रभाव अधिकआहे. हळबीत स्त्राrलिंग व पुल्लिंग अशी दोनच लिंगेआहेत मराठीतील नपुसकलिंगी शब्द (नामे) पुल्लिंगात येतात. मन हा अनेक वचनदर्शक प्रत्यय उदा. बाबामन (अनेक) हममन (आम्ही) हळबीची सर्वनामाची रूपे लक्षात घेण्यासारखी व प्रमाण मराठीपेक्षा वेगळी आढळतात. हिंदीप्रमाणेच पूर्वीच्या अनार्य भाषेतील संस्कार सर्वनामाच्या प्रत्ययावर टिकून राहिले असतील हळबी बोलीचा उगम महाराष्ट्राबाहेर झाला असला तरीही महाराष्ट्रात त्यामध्ये मराठी शब्दांचा खूप समावेश असल्यामुळे तिला मराठी भाषेतील बोली असल्याचे काही भाषा वैज्ञानिक मानतात.
























































