। मनापाविजे सर्वही सुख जेथे।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संध्या शहापुरे

चंचल मनाला स्थैर्य प्राप्त करून द्यायचे असेल तर राघवाच्या पायाशी राहा. ज्या ठिकाणी संपूर्ण सुख लाभते त्या प्रभू रामाच्या ठायी अतिशय उच्च भावनेने लक्ष केंद्रित कर. सदसद्विवेकबुद्धीने कपटी कल्पनांना उलथवून टाक. मनाला रामस्थित करून सुखी हो!’ असा उपदेश समर्थ रामदास या श्लोकात करतात. मानवी मन खूप चंचल आहे. जे क्षणभंगूर गोष्टींच्या मागे सारखे धावत असते. कधी संपत्तीचा पाठलाग करते, तर कधी प्रसिद्धी कशी मिळेल यासाठी फिरत राहते. मन सततच सांसारिक प्रेमात डुंबत राहते.कधी भावनिक आसक्तीने व्याकूळ होते. मन कधी अविचारी होते .तर कधी स्वप्नात अडकून पडत असते .मन कधी शक्तिपात झाल्यासारखे हातबल होते. तर कधी अहंकाराने उन्मत्त होते. मन सतत अतृप्तच राहतं व दुःखी होतं. कधी मनाला मार्ग न सापडल्याने ते भटकत राहतं. कधी मन भ्रम ,नैराश्याने ग्रस्त होतं. अशा मनाला संयमित करण्यासाठी रामनाम घ्या. न डगमगता आपले विहित कर्म शांतपणे करत राहणे, हाच विवेकी मार्ग आहे. ‘शांती परते नाही सुख। येर अवघेची दुःख। म्हणून शांती धरा। उतरा पैलतीरा।।’
‘तुका म्हणे त्रिविध ताप। जाती मग आपोआप। खवळालिया कामक्रोधी। अंगी भरली आधिव्याधी।।