
>> प्रा. आशुतोष पाटील
[email protected]
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या पाठय़पुस्तकांमधील बदलांमुळे मोहेंजोदडो येथील प्रसिद्ध ‘डान्सिंग गर्ल’ मूर्ती पुन्हा चर्चेत आली आहे. काही इतिहासकार आणि पुरातत्वज्ञांनी या मूर्तीच्या संदर्भात करण्यात आलेल्या बदलांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मात्र या वादाच्या पलीकडे जाऊन पाहिले, तर डान्सिंग गर्ल ही केवळ एक कलाकृती नसून ती जगातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते.
सिंधू संस्कृतीचा शोध हा विसाव्या शतकातील जगातील सर्वात महत्त्वाच्या पुरातत्वीय शोधांपैकी एक मानला जातो. इजिप्तची संस्कृती, मेसोपोटेमिया आणि चीनच्या प्राचीन संस्कृतींच्या बरोबरीने भारतीय उपखंडातही अत्यंत प्रगत नागरी संस्कृती अस्तित्वात होती, हे सिंधू संस्कृतीच्या शोधामुळे सिद्ध झाले. सुमारे इ.स.पू. 2600 ते 1900 या काळात ही संस्कृती उत्कर्षाला पोहोचली होती. आजच्या पाकिस्तान, उत्तर-पश्चिम भारत आणि अफगाणिस्तानच्या काही भागांमध्ये तिचा विस्तार होता. हडप्पा, मोहेंजोदडो, धोलावीरा, राखीगढी, कालीबंगन, लोथल आणि बनावली यांसारखी अनेक महत्त्वाची शहरे या संस्कृतीचा भाग होती. यांपैकी मोहेंजोदडो हे सर्वाधिक प्रसिद्ध आणि विस्तृत उत्खनन झालेले शहर आहे. सिंध प्रांतातील सिंधू नदीच्या खोऱयात वसलेले हे नगर 1922 साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी राखालदास बॅनर्जी यांनी शोधून काढले. त्यानंतर सर जॉन मार्शल, अर्नेस्ट मॅके, मॉर्टिमर व्हीलर यांसारख्या पुरातत्वज्ञांनी येथे मोठय़ा प्रमाणात उत्खनने केली. या उत्खननांनी भारतीय इतिहासाबद्दलची समजच बदलून टाकली. कारण त्याआधी भारतीय नागरीकरणाचा इतिहास प्रामुख्याने वैदिक काळापासून सुरू होतो असे मानले जात होते.
मोहेंजोदडोच्या उत्खननात सर्वप्रथम लक्ष वेधून घेतले ते येथील अद्भुत नगररचनेने. शहराचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध होते. मुख्य रस्ते उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम दिशेत आखण्यात आले होते. जवळजवळ प्रत्येक घरात विहीर, स्नानगृह आणि सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था होती. यावरून त्या समाजातील सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि नागरी नियोजनाचे महत्त्व लक्षात येते. मोहेंजोदडोमध्ये सापडलेली प्रसिद्ध वास्तू म्हणजे ‘ग्रेट बाथ’- ‘मोठे स्नानगृह.’ जगातील सार्वजनिक वास्तुकलेच्या इतिहासात ही एक अद्वितीय निर्मिती मानली जाते.
मोहेंजोदडोमधील पुरातत्वीय अवशेषांमधून व्यापाराचेही पुरावे मिळतात. सिंधू संस्कृतीतील लोक धातुकामातही प्रवीण होते. तांबे, कांस्य, सोने आणि चांदी यांचा वापर करून विविध वस्तू तयार केल्या जात होत्या. याच धातुकौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे मोहेंजोदडोची प्रसिद्ध ‘डान्सिंग गर्ल.’ 1926 मध्ये उत्खननादरम्यान सापडलेली ही कांस्य मूर्ती अवघी 10.8 सेंटीमीटर उंच आहे. ती ‘लॉस्ट-वॅक्स’ तंत्राने तयार करण्यात आली होती. या तंत्रात मेणाचा नमुना तयार करून त्याभोवती साचा बनवला जातो आणि नंतर त्यामध्ये वितळलेला धातू ओतला जातो. एवढय़ा प्राचीन काळात हे तंत्रज्ञान विकसित झाले होते, ही बाबच आश्चर्यकारक आहे. या मूर्तीतील तरुणीचा आत्मविश्वासपूर्ण उभा राहण्याचा अंदाज, हातांतील बांगडय़ा आणि नैसर्गिक शरीररचना पाहून त्या काळातील कलाकारांच्या निरीक्षणशक्तीची आणि कौशल्याची कल्पना येते. ‘डान्सिंग गर्ल’ हे नाव आधुनिक अभ्यासकांनी दिलेले असले, तरी ती प्रत्यक्षात नर्तकी होती याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. तथापि, ही मूर्ती सिंधू संस्कृतीतील कलात्मक अभिव्यक्तीची सर्वोच्च उदाहरणांपैकी एक मानली जाते. मोहेंजोदडोमधील आणखी एक कलाकृती म्हणजे तथाकथित ‘पुरोहित-राजा’ म्हणून ओळखली जाणारी दगडी प्रतिमा. या मूर्तीतील व्यक्तीच्या अंगावरील वस्त्रs, चेहऱयावरील गंभीर भाव आणि कलाकुसर पाहून त्या काळातील उच्च दर्जाची शिल्पकला लक्षात येते.
मोहेंजोदडोचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे आजतागायत न उलगडलेली सिंधू लिपी. हजारो शिक्के आणि मृद्भांडांवर ही लिपी आढळते. परंतु अद्याप कोणालाही तिचे संपूर्ण वाचन करता आलेले नाही. त्यामुळे त्या समाजाची भाषा, धार्मिक आस्था, राजकीय व्यवस्था आणि साहित्य यांविषयी अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. हीच बाब सिंधू संस्कृतीला अधिक गूढ आणि आकर्षक बनवते. 1980 साली मोहेंजोदडोला ळऱSिंण्ध् ने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. 2026 मध्ये मोहेंजोदडोच्या प्रसिद्ध ‘डान्सिंग गर्ल’ मूर्तीवरून देशभरात नवा वाद निर्माण झाला. NCERT च्या इयत्ता नववीच्या कला शिक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या मधुरिमा या नवीन पाठय़पुस्तकात या मूर्तीचे चित्र मूळ स्वरूपात न दाखवता त्यामध्ये बदल करण्यात आल्याचे आढळून आले. मूर्तीच्या उघडय़ा धडावर छायांकन करून तो भाग झाकण्यात आला होता. या बदलामुळे इतिहासकार, पुरातत्वज्ञ, कलाकार आणि शिक्षणतज्ञांनी आक्षेप नोंदवला. त्यांच्या मते, सुमारे 4500 वर्षांपूर्वीच्या मूळ पुरावस्तूचे स्वरूप बदलून दाखवणे म्हणजे इतिहास आणि पुरातत्वीय वास्तवाशी तडजोड करण्यासारखे आहे.
या वादाच्या केंद्रस्थानी एक मूलभूत प्रश्न होता. शैक्षणिक पुस्तकांमध्ये ऐतिहासिक वस्तू जशाच्या तशा दाखवाव्यात की आधुनिक सामाजिक संवेदनशीलतेनुसार त्यात बदल करावेत? बदलाचे समर्थन करणाऱयांचे मत होते की, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रे अधिक ‘वयोगटानुसार योग्य’ (age – apporopriate) करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु विरोधकांच्या मते, पुरातत्वीय वस्तूंमध्ये अशा प्रकारे फेरफार करणे म्हणजे इतिहासाचे सौंदर्यीकरण किंवा सेन्सॉरशिप करण्यासारखे आहे.
विशेष म्हणजे, डान्सिंग गर्ल ही मूर्ती अनेक दशकांपासून NCERT च्या विविध पाठय़पुस्तकांमध्ये मूळ स्वरूपात प्रकाशित होत होती. त्यामुळे अचानक करण्यात आलेला हा बदल अधिक चर्चेचा विषय ठरला. सामाजिक माध्यमांवर, वृत्तपत्रांमध्ये आणि शैक्षणिक वर्तुळात मोठय़ा प्रमाणावर याबाबत चर्चा सुरू झाली. अनेक पुरातत्वज्ञांनी असे नमूद केले की, जगभरातील संग्रहालयांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ही मूर्ती मूळ स्वरूपातच प्रदर्शित केली जाते आणि तिच्यातील कलात्मकता ही तिच्या ऐतिहासिक मूल्याचा अविभाज्य भाग आहे. वाद वाढल्यानंतर NCERT ने या प्रकरणाचा पुनर्विचार केला आणि तज्ञ समितीशी चर्चा करून मूर्तीचे मूळ चित्र पुन्हा पाठय़पुस्तकात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. डिजिटल आवृत्तीत त्वरित सुधारणा करण्यात आली आणि पुढील मुद्रित आवृत्त्यांमध्येही मूळ प्रतिमा वापरण्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे हा वाद काही प्रमाणात निवळला असला तरी त्याने इतिहास, पुरातत्व आणि शालेय शिक्षण यांच्यातील संबंधांवर महत्त्वपूर्ण चर्चा घडवून आणली.
मोहेंजोदडोचे महत्त्व केवळ पुरातत्वीय स्थळ म्हणून नाही, तर मानवाच्या नागरी विकासाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. नियोजनबद्ध शहरे, उत्कृष्ट जलव्यवस्था, प्रगत व्यापार, धातुकाम, कला आणि अजूनही न उलगडलेली लिपी या सर्व गोष्टी मोहेंजोदडोला जगातील सर्वात महत्त्वाच्या पुरातत्वीय स्थळांमध्ये स्थान मिळवून देतात. आणि या संपूर्ण संस्कृतीचे सर्वाधिक लोकप्रिय प्रतीक म्हणून तथाकथित ‘डान्सिंग गर्ल’ आजही इतिहासाच्या मंचावर तितक्याच आत्मविश्वासाने उभी आहे.
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)

























































