
>> डॉ समिरा गुजर जोशी
[email protected]
कविकुलगुरू कालिदासाच्या साहित्यिक रचनेतील सर्वात सुंदर काव्य म्हणजे मेघदूत. कवी म्हणून कालिदासाच्या प्रतिभेचे अतिशय प्रगल्भ रूप मेघदूतात पाहायला मिळते. काव्याच्या सर्व पैलूंची श्रेष्ठता असणारे मेघदूत त्यातील सौंदर्यासक्त भावनेने अधिक जोडून ठेवते. प्रतिभासंपन्नतेचा अनुभव देणाऱया या काव्याचे हे रसग्रहण.
आता पावसाची चाहूल लागते आहे. अशा वेळी ‘मेघदूत’सारख्या काव्याचा आढावा घेणे ह्यापेक्षा अधिक आनंददायी काय असू शकते. ह्या अवघ्या 54-55 श्लोकांच्या चिमुकल्या काव्याची लोकप्रियता अद्भुत आहे. कुसुमाग्रज म्हणाले होते की, मला एखाद्या निर्जन बेटावर एकटय़ालाच सोडले आणि एकच पुस्तक घेऊन जायची परवानगी असेल तर मी ‘मेघदूत’ची निवड करेन. माधव ज्युलियन म्हणतात, “होतो वाचित मेघदूत, कवि तो केव्हा पडेना फिका.’’ असं काय खास आहे ह्या काव्यात? किती जणांनी मेघदूतचे अनुवाद करून पाहिले याची तर गणतीच नाही. मराठीतच कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, शांताबाई (शांता शेळके), अगदी भारताचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनाही ‘मेघदूत’चा अनुवाद करावासा वाटला.
आपण कालिदासाचे ‘ऋतुसंहार’ पाहिले आणि आता ‘मेघदूत’ पाहतो आहोत. पण दोन्हीमध्ये खूप अंतर आहे. कवी म्हणून कालिदासाच्या प्रतिभेचे अतिशय प्रगल्भ रूप मेघदूतात पाहयला मिळते. म्हणजे ‘ऋतुसंहार’ कनिष्ठ प्रतीचे काव्य आहे असे नाही, पण ‘मेघदूत’ची उंची ते गाठत नाही. म्हटले तर दोन्ही काव्यांत निसर्गाचे वर्णन आहे, पण ऋतुसंहार ह्या काव्यातील प्रत्येक श्लोक सुटा सुटा आहे. त्याला कथानक नाही. मेघदूत मात्र एका सूत्रात बांधलेले काव्य आहे. काय आहे ते सूत्र. कालिदासाने त्याच्या कथानकाची बांधणी इतकी कौशल्यपूर्ण केली आहे की प्रत्येक वेळी त्याचे नवे नवे कंगोरे ध्यानी येतात. तो कालिदासाचा नायक यक्ष आणि त्याच्यापासून दूर असलेली त्याची प्रिय पत्नी हे आपल्याला आपले वाटू लागतात. इतकेच नाही तर आपण नकळत त्यांच्या जागी स्वतला ठेवू पाहतो. मेघदूत जरी यक्षाचा निरोप नेत असला तरी त्यात प्रत्येक प्रेमी जिवाला आपले प्रतिबिंब जाणवते. हे कालिदासाने कसे साधले आहे? आपण त्याचा पहिलाच श्लोक पाहू. शांताबाईंनी केलेला अनुवाद समजून घ्यायला सोपा म्हणून मूळ संस्कृत श्लोकाऐवजी तो मराठी श्लोक समोर ठेवूया.
कुबेर सेवक यक्ष कुणी सेवे माजी आपुल्या चुकला प्रिया वियोगे अधिकच दुःसह वर्षाचा त्या शाप मिळाला जनकसुतेच्या स्नानांयोगे पावन झाले जिथे जलाशय घनच्छाय त्या रामगिरीवर विविध आश्रमी घेई आश्रय बघा, एका श्लोकात त्याने यक्षाची ‘बॅक स्टोरी’ सांगितली आहे. कुबेराचा सेवक असणारा हा कुणी एक यक्ष. आता ह्या यक्षाचे नाव नाही, आडनाव नाही. तो कुणी एक यक्ष आहे. आता हे कालिदासाने जाणीवपूर्वक केले आहे. यक्षाला नाव नाही, यक्षपत्नीलाही नाही. कारण प्रत्येक वाचक आपल्या कल्पनेने त्यांना रूप देतील. त्यांना स्वतचे प्रतिबिंब तिथे पाहणे त्यामुळेच सोपे जाईल. त्यांचा पत्ता मात्र आहे. कारण प्रत्येकाच्या मनात एक प्रेमाचा उत्कर्ष साधणारी अलका नगरी असते. अलकानगरी म्हणजे स्वर्गच. आपले प्रियजन जिथे आहेत ते घर प्रत्येकाला स्वर्गासमानच भासते. म्हणून नाव नसलेल्या या नायकाच्या प्रेमसंदेशावर पत्ता मात्र आहे. किंबहुना यक्ष मेघाला पत्ताच सांगतो आहे. आणि हे कालिदासाने अगदी सहज केले आहे. त्याची काव्यतंत्रावर असलेली हुकूमत इथे लक्षात येते. आता मूळ संस्कृत श्लोकातील एक शब्द बघा. ‘शापेनास्तङ्गमित-महिमा’ – शाप मिळाल्यामुळे ज्याच्या जादुई शक्ती नाहीशा झाल्या आहेत. ही पण कालिदासाची युक्ती पहा.
यक्ष म्हटल्यावर त्याच्याकडे दैवी शक्ति असणार. कलिदासाला तर हवे आहे की सामान्य माणसालाही यक्ष आपला वाटावा. फार यशस्वी माणसे आपल्याला प्रेरणादायी वाटतात, पण आपली वाटत नाहीत. यक्ष मात्र आता तुमच्या माझ्यासारखा साधारण झाला आहे. त्याच्याकडे कोणत्याही खास शक्ती नाहीत. का बरं शाप मिळाला यक्षाला? अशी काय चूक घडली त्याच्या हातून? ह्याचे थेट उत्तर कालिदास आपल्याला देत नाही. पण परंपरा देते, म्हणजे कालिदासाच्या साहित्यावर पुढे ज्यांनी लिहिले त्यांनी ही गोष्ट सांगितली.
ही गोष्टही किती समर्पक आहे पहा. यक्षाकडे रोज पहाटे कुबेराला शिवपूजेसाठी ताजी फुललेली फुले आणून देण्याची कामगिरी होती. पहाटे आपल्या प्रिय पत्नीपासून दूर जाण्याचे जिवावर येत असल्यामुळे त्याने एक दिवस आदल्या रात्रीच फुले आणून ठेवली आणि ती पहाटे कुबेराला नेऊन दिली. फुले रात्रीच तोडली असल्यामुळे एका कमळामध्ये भुंगा अडकून पडला होता. सकाळी कुबेराने शिवाला फुले अर्पण करण्यासाठी फूल हातात घेतले आणि तो भुंगा त्याच्या बोटाला चावला. त्यामुळे त्याने चिडून यक्षाला शाप दिला. त्याच्या सगळ्या शक्ती काढून घेतल्या आणि त्याला वर्षभरासाठी अलकानगरीतून बाहेर राहण्याची शिक्षा सुनावली. एका प्रेमिकाला आपल्या अतिरेकी प्रेमापोटी झालेली शिक्षा. म्हटले तर अपराध लहान, शासन मात्र मोठे. सगळ्यामुळे यक्ष अधिकच आपला वाटू लागतो. प्रेमासाठी अशी कर्तव्यात कुचराई आपणही कधी ना कधी केलेली असतेच ना!
हे असे एका श्लोकाद्वारे नायकाचा थेट वाचकांच्या मनात शिरकाव करण्याचे कौशल्य कालिदासाचे कविकुलगुरूपद सार्थ करते.
(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि
संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)

























































