
थकीत देण्यांसह पगारवाढ, ‘बेस्ट’ उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिकेत विलीन करावा, खासगीकरण बंद करावे आणि प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात यासाठी ‘बेस्ट’ संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेला संप दुसऱ्या दिवशीही सुरू राहिल्याने प्रशासनाने कर्मचारी आणि बस पुरवठादार कंपन्यांना ‘मेस्मा’ कायद्यांतर्गत नोटीस बजावल्या आहेत. दरम्यान, सलग दुसऱया दिवशीही बेस्टचा संप सुरू राहिल्याने मुंबईकरांचे हाल झाले.
‘बेस्ट’ कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी 2016 पासून प्रशासनाकडे पाठपुरावा, आंदोलने, संप करीत आहेत. मात्र याची दखल घेतली गेलेली नाही. मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतल्याचे निमंत्रक अॅड. उदयकुमार आंबोणकर यांनी सांगितले.
रिक्षा-टॅक्सीसाठी रांगा, प्रवाशांची लूट
आज सकाळपासून ‘बेस्ट’ची एकही बस रस्त्यावर धावली नाही. त्यामुळे ठिकठिकाणी रिक्षा-टॅक्सीसाठी नोकरदार-प्रवाशांच्या रांगा लागल्या. रिक्षा-टॅक्सीसह खासगी वाहनचालकांनी जादा भाडे आकारून गैरफायदा घेतल्याचा आरोप प्रवाशांनी केला.
‘नीट’च्या विद्यार्थ्यांसाठी 160 एसटी
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 100 बसगाडय़ा उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच रविवारी ‘नीट’च्या मुंबईतील 63 परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना जाण्यासाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
संपावर तातडीने तोडगा काढा – शिवसेना
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल होत असून कर्मचाऱ्यांवरही अन्याय होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू यांनी आज दिंडोशी बस आगाराला भेट देत आंदोलक कर्मचाऱयांशी संवाद साधला. बेस्ट प्रशासन आणि सरकारने कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळू नये अशी मागणी करतानाच याबाबत अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.





























































