
अमेरिकेसोबत झालेल्या शांतता करारावर स्वाक्षरी करून दोन दिवस उलटत नाही तोच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून इराणने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगाचे टेन्शन पुन्हा वाढले आहे. शनिवारी आखातात या घडामोडी सुरू असतानाच हिंदुस्थानचे ध्वज असणारी तीन महाकाय तेलवाहू जहाजं होर्मुझमधून निसटली. या जहाजांवर तब्बल 8.6 लाख मेट्रिक टनांहून अधिक कच्चे तेल असून ही जहाजं हिंदुस्थानच्या दिशेने मार्गस्थ झाल्याची माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली.
गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्याबाबत आणि होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली करण्याबाबत इराण आणि अमेरिकेमध्ये एकमत झाले होते. दोन्ही देशांमध्ये याबाबत ऐतिहासिक करार झाला होता. मात्र हा करार होऊन 48 तास उलटत नाही तोच इस्रायलने लेबनॉनवर भीषण हल्ले केले. यामुळे संतापलेल्या इराणने कराराचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली.
होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी पुन्हा बंद होण्याआधी हिंदुस्थानची ‘देश वैभव’, ‘देश विभोर’ आणि ‘सनमार हेराल्ड’ ही तीन तेलवाहू जहाजं तिथून सुखरूप बाहेर पडली. या तीनही जहाजांवर 94 क्रू मेंबर्स असून सर्वजण सुरक्षित आहेत. 24 जून ते 1 जुलै या दरम्यान ही महाकाय तेलवाहू जहाजं हिंदुस्थानातील विविध बंदरांवर पोहोचतील, अशी माहितीही सोनोवाल यांनी दिली. ‘द हिंदू‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
इस्रायलने धुडकावला शांतता करार; लेबनॉनवर भीषण हल्ला, 18 जणांचा मृत्यू
‘देश वैभव’ हे जहाज 24 जून रोजी गुजरातच्या वाडिनार बंदरात पोहोचेल, तर ‘देश विभोर’ हे जहाजही 24 जून रोजीच गुजरातच्या सिक्का बंदरात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच शनिवारी होर्मुझची सामुद्रधुनी पार केलेले ‘सनमार हेराल्ड’ हे तिसरे जहाज 1 जुलै रोजी ओदिशातील पारदीप बंदरात पोहोचेल.
प्रेसिडंट ट्रम्प, नीट लक्षात ठेवा… इटली आणि मी कधीच कुणाची याचना करत नाही! जॉर्जिया मेलोनी भडकल्या























































