पेरण्या खोळंबल्या, बळीराजाचे लक्ष आभाळाकडे; बेडकाचे डराव डराव कोरडे गेले, आता गाढव तरी पाऊस पाडेल काय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मृग नक्षत्र संपत आले असले तरी पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे ‘भाताचे कोठार’ म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस पडत नसल्यामुळे बळीराजाचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. यंदा मृग नक्षत्राचे वाहन बेडूक असल्याने पाऊस जास्त पडणार असा शेतकऱ्यांचा अंदाज होता, मात्र तो फोल ठरला आहे. येत्या सोमवारपासून आर्द्रा नक्षत्र सुरू होत आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव आहे. मृगाचा बेडूक कोरडा गेला, आता आर्द्राचे नक्षत्राचे वाहन गाढव पाऊस पाडेल काय, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहे.

‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचे वेळापत्रक बिघडले आहे. मृग नक्षत्र उद्या संपत आहे. हे संपूर्ण नक्षत्र कोरडे गेल्यामुळे रायगड जिल्ह्यात कोठेच पेरण्या झाल्या नाहीत. गेल्या वर्षी मृग नक्षत्राच्या अगोदर रोहिणी नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली होती. संपूर्ण जिल्ह्यात धो धो पाऊस पडला होता. मात्र यंदा रोहिणी नक्षत्रात पाऊस पडलाच नाही. त्यापाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडे गेले. पावसाने दडी मारल्यामुळे भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. भाताची पेरणी वेळेत होणार नसल्याचे त्याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

रायगडमधील बहुतांश शेतकरी मान्सूनवर अवलंबून आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात झाल्यानंतर भातपेरणीच्या कामांना वेग येतो. मात्र यंदा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांवर आकाशाकडे पाहण्याची वेळ आली आहे. पाऊस आणखी उशिरा झाल्यास पेरणीचे वेळापत्रक बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलादपूर, महाड, माणगाव, रोहा, तळा, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांमध्ये मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी निराश झाले आहेत.

… तर मोठे संकट

जून महिन्यातील तीन आठवडे संपत आले तरी अजून पाऊस पडलेला नाही. काही दिवसांत पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहील, बळीराजा उद्ध्वस्त होईल, असे खारेपाट येथील शेतकरी राजेश म्हात्रे म्हणाले.

आर्थिक गणित कोलमडणार

पाऊस लांबल्यामुळे पेरणीचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले आहे. त्यामुळे खरीप हंगामाचे आर्थिक गणितही बिघडेल. उशिरा पेरणी झाली तर त्याचा उत्पादनावर परिणाम होईल, असे अलिबागचे शेतकरी समीर पाटील यांनी सांगितले.

चाराटंचाई; गुरांची उपासमार

मान्सून लांबलेला असतानाच उन्हाचा तडाखाही वाढला आहे, पाणीटंचाई तीव्र झाली आहे, त्यामुळे हिरव्या व सुक्या चाऱ्याअभावी जनावरांची उपासमार होऊ लागली आहे. त्यांना अन्नपाण्यासाठी उकिरड्याचा आधार घ्यावा लागत आहे. पाली शहरातील मोकाट गुरे डंपिंग ग्राऊंड व उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात आहेत.

वाढत्या उष्म्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शहरातील डंपिंग ग्राऊंडवर तसेच जुने पोलीस स्थानक, मधली आळी, बल्लाळेश्वर मंदिर, बल्लाळेश्वर नगर या ठिकाणी उकिरड्यावर सकाळपासूनच मोकाट गुरे चरण्यासाठी येतात. येथे टाकलेला कचरा गुरे अस्ताव्यस्त करतात. त्यामुळे येथे घाण व दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यदेखील धोक्यात येते. बऱ्याचवेळा टाकून दिलेले अन्नपदार्थ पिशव्यांमध्ये असते. परिणामी गुरांच्या पोटात कमी अधिक प्रमाणात प्लॅस्टिक जाते. प्लॅस्टिक, धातू व सडके आणि कुजलेले अन्नपदार्थ खाऊन या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे.