छापलेली अक्षरे बारीक आणि अस्पष्ट होती! चुकीच्या मराठी वाचनाबद्दल राहुल नार्वेकर यांची दिलगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवंगत पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मराठीतून वाचताना केलेल्या अक्षम्य चुकांमुळे ट्रोल झालेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिलगिरी व्यक्त केली. ‘मला मिळालेली भाषणाची छापील प्रत अस्पष्ट होती. त्यावरची अक्षरे खूप बारीक होती. त्यातून ही चूक घडली,’ असा खुलासा नार्वेकर यांनी केला.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रथेप्रमाणे नार्वेकर यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडले. आशा भोसले यांचा शोकप्रस्ताव वाचताना त्यांनी नावांचे आणि अनेक मराठी शब्दांचे चुकीचे उच्चार केले. आशा ऐवजी अशा, पद्मविभूषण ऐवजी पद्मविपुषण आणि दीनानाथ मंगेशकरऐवजी दीनदयाल मंगेशकर असा उल्लेख त्यांनी केला. शब्दांबरोबर वाक्यरचनेच्याही चुका केल्या. या भाषणानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. त्या पार्श्वभूमीवर आज सभागृहाचे कामकाज सुरू करण्याआधीच नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिले.

 

‘माझ्या हातात आलेली प्रस्तावाची प्रत अत्यंत बारीक अक्षरात आणि थोडी अस्पष्ट होती. त्यातील चुका आधी दुरुस्त करण्यात आल्या नव्हत्या. तेच जसेच्या तसे वाचले गेल्याने गोंधळ झाला, असे नार्वेकर म्हणाले. गेली चार वर्षे अध्यक्ष म्हणून मी सभागृहाचे संपूर्ण कामकाज मराठीतच हाताळले आहे. मराठीबद्दल जितका अभिमान या सभागृहातील प्रत्येक सदस्याला आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आहे, तेवढाच अभिमान मलाही आहे. आशाताईंबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही राज्यातील कोणती व्यक्ती करू शकत नाही. विधानसभेचे अध्यक्ष तर मुळीच नाही. जे घडले ते अनावधानाने घडले आहे. त्याचा कुणी वेगळा अर्थ काढू नये. माझ्या भाषणामुळे राज्यातील वा सभागृहातील कुणाचेही मन दुखावले असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो,’ असे नार्वेकर म्हणाले.

जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची शिवसेनेची मागणी
नार्वेकर यांच्या खुलाशानंतर शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी यासंदर्भात भूमिका मांडली. ‘चुकीची आणि अस्पष्ट प्रिंट देऊन अध्यक्षांची व पर्यायाने सभागृहाची प्रतिमा मलिन करणाऱ्या संबंधित विभागाच्या प्रमुखावर योग्य आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.