
इस्लामाबादमधील परराष्ट्र कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानच्या नेतृत्वाचे अभिनंदन केले असून अमेरिका आणि इराणमधील मध्यस्थीच्या प्रयत्नांना ‘मजबूत पाठिंबा’ देण्याचे आश्वासन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बुधवारी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि त्यांचे चिनी समकक्षा यांच्यात फोनवर चर्चा झाली.
या चर्चेत प्रामुख्याने इराण-अमेरिका शांतता प्रक्रियेवर भर देण्यात आला. यामध्ये विशेष मुद्दा पाकिस्तान आणि कतार यांच्या मध्यस्थीने स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या उच्चस्तरीय चर्चेच्या पहिल्या फेरीचा होता. यावेळी वांग यांनी शांतता आणि स्थिरतेसाठी पाकिस्तानने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
‘त्यांनी युएनच्या नियमांप्रमाणे वादांवर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या महत्त्वावर भर देत, पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना चीनचा मजबूत पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला’, असे त्यात म्हटले आहे.
दार यांनी माहिती दिली की, या चर्चेमुळे गेल्या आठवड्यात अमेरिका आणि इराण दरम्यान स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारांतर्गत मध्यस्थी प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे, असे या निवेदनात सांगण्यात आले आहे.
अणू ऊर्जाविषयक समस्या, निर्बंध आणि देखरेख यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तीन वर्किंग ग्रुप्स तयार करण्यात आले आहेत, ज्यांचा उद्देश ६० दिवसांच्या आत अमेरिका आणि इराण दरम्यान अंतिम करारासाठी मदत करणे हा आहे.
दोन्ही नेत्यांनी अमेरिका आणि इराणमधील शत्रुत्व कायमचे संपवण्यासाठी आणि शाश्वत शांतता, सामायिक विकास व सामूहिक समृद्धीला चालना देण्यासाठी, चर्चा करून तोडगा काढण्याच्या उद्देशाने पाकिस्तान आणि चीन एकत्र येऊन काम करतील या संकल्पाचा पुनरुच्चार केला, असे त्यात म्हटले आहे.






























































