
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अलीकडेच घडलेल्या भीषण अपघातामुळे ग्रामीण भागातील बेकायदा प्रवासी वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याप्रकरणी शिवसेनेच्या मागणीनंतर परिवहन विभाग अॅक्शन मोडवर आले असून मालवाहतूक गाड्यांमधून बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे परवाने रद्द करण्यात येईल, असे निर्देश परिवहन मंत्र्यांनी आज विधान परिषदेत दिले. तसेच या मार्गावर सध्या तात्पुरत्या स्वरुपात दर तासाला बस सेवा उपलब्ध केली असून पुढील दोन ते तीन महिन्यांत दर अर्ध्या तासाने बस सेवा उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेकडून डहाणू-मुरबाडला जाणारी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे लोक प्रवासासाठी अवैध वाहतुकीचा वापर करतात. या पार्श्वभूमीवर एकात्मिक वाहतूक यंत्रणा निर्माण करण्यासाठी सरकार या ठिकाणी प्रयत्न करेल का? क्षमतेपेक्षा जादा वाहतूक करणाऱ्यांचा परवाना रद्द करणार का? अशी लक्षवेधी सूचना आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थित केली. त्यावर मालवाहू वाहनांतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. या दोन्ही घटनांप्रकरणी संबंधित वाहन चालक मालकांवर गुन्हे दाखल केले असून परवाना रद्द करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या मागणीनंतर परिवहन विभागाला जाग- ग्रामीण व दुर्गम भागासाठी मिनी बस
ग्रामीण व दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शंभर मिनी बसेस एसटीच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच शेतकरी कुटुंबांना लग्नसराईसाठी माफक दरात एसटी बस उपलब्ध करून देण्याची योजना राबवण्याचा विचार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.


























































