व्हेनेझुएलात भूकंपबळींची संख्या 589 वर, 39 हजार बेपत्ता; युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू, मलब्याखाली हजारो जीव अडकलेलेच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हेनेझुएलामध्ये बुधवारी आलेल्या दोन भीषण भूकंपात आतापर्यंत 589 नागरिकांचा मृत्यू झाला असून 39 हजार लोक बेपत्ता असल्याची माहिती व्हेनेझुएलाच्या सरकारने दिली आहे. शेकडो लोक इमारतींच्या मलब्याखाली दबले असून त्यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

व्हेनेझुएलामध्ये 7.2 आणि 7.5 रिश्टर तीव्रतेच्या दोन भूकंपांनी हादरे दिले. 1821 च्या मुक्तीसंग्रामचा स्मृतिदिन असल्यामुळे बुधवारी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे बहुतांश नागरिक घरीच फुटबॉल विश्वचषक सामने पाहत होते. भूकंपामुळे शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या. घरातच असलेले हजारो नागरिक इमारतींच्या मलब्यात गाडले गेले. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 589 जणांचा मृत्यू झाला असून 4 हजारांपेक्षा जास्त जखमी झाले आहेत. तर, 39 हजार नागरिक बेपत्ता आहेत. भूकंपाच्या भीषणतेचे वास्तविक चित्र अजुनही समोर आलेले नाही. मलब्याखाली अनेक लोक जिवंत असून त्यांचे आवाज ऐकू येत आहेत. त्यामुळे युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात येत आहे. या नैसर्गिक संकटामुळे व्हेनेझुएलाला 9.5 लाख कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

भूकंपानंतर भीतीमुळे हजारो नागरिकांनी रस्त्यावरच रात्र काढली. अनेक ठिकाणी इंटरनेट बंद आहे. पिण्याचे पाणी, वीज पुरवठा आणि गॅस पुरवठादेखील खंडित झाला आहे.

मलब्याखाली चिमुकलीचा जन्म

भूकंपामुळे झालेल्या विध्वंसात शेकडोंचे प्राण गेले. मात्र, त्याचवेळी एक नवे आयुष्यदेखील सुरू झाले. मलब्याखाली दबलेल्या एका महिलेने एका मुलीला जन्म दिला. या चिमुकलीला तिच्य आईसोबत सुरक्षित बाहेर काढण्यात आले. भूकंपामुळे धावपट्टीवर उभे असलेले विमान हलायला लागले. विमानत बसलेले प्रवासी त्यामुळे भयभीत झाले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हिंदुस्थानचे व्हेनेझुएलासाठीऑपरेशन अमिस्ताद

हिंदुस्थानने भूकंप प्रभावित व्हेनेझुएलाला वैद्यकीय व इतर मदत पाठविली आहे. हिंदुस्थानी हवाई दलाचे दोन सी-17 विमान व्हेनेझुएलाकडे झेपावले. त्यात फिल्ड हॉस्पिटल युनिट तसेच 35 टनांपेक्षा जास्त औषधी, अन्न व इतर मदत पाठवण्यात आली आहे. याशिवाय इतर देशांनीही मदत पाठवली आहे. संयुक्त राष्ट्रानेही 1.5 अब्ज डॉलरची मदत देऊ केली आहे.