पेपरफुटीमागे आंतरराज्यीय टोळी… सूत्रधार फरार, आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फोडणारे सर्वच आरोपी हे परप्रांतीय आहेत. त्यामुळे या पेपरफुटीमागे आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय ठाणे पोलिसांनी व्यक्त करून त्या दिशेने तपास सुरू केला आहे. टीईटीचा पेपर लिक करणाऱ्या तिन्ही आरोपींना आज भिवंडी सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना येत्या 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. सुतार यांनी दिले. टीईटीचे पेपर लिक करणारा मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षेच्या आदल्या दिवशी शनिवारी राजीव कुमार, आकाश कुमार आणि धीरज सिंग हे तिघे भिवंडी येथे परीक्षार्थींना पेपर विकण्यासाठी आले होते. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील ओवळी-डोंगराळी गावाजवळ सापळा रचून या तिघांवर झडप घातली. आज या तिन्ही आरोपींना भिवंडी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. सुतार यांनी तिन्ही आरोपींची कसून चौकशी करण्यासाठी त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

टीईटी पेपरफुटी प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी दोन फरार आरोपी निष्पन्न झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांनी महाराष्ट्रात अजून कुठे पेपर विक्री केली आहे, काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का, प्रश्नपत्रिका नेमक्या आणल्या कोठून. धीरज हा हरियाणाचा तर अन्य दोन आरोपी बिहारचे आहेत. हे तिघेही दिल्लीहून महाराष्ट्रात आले होते. प्राथमिक तपासात त्यांनी टीईटीची प्रश्नपत्रिका विक्रीसाठी आणल्याचे समोर आले असून त्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

तिन्ही आरोपी परप्रांतीय या पेपर फुटीमागे आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता आहे, असे मुद्दे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विजय मराठे यांनी न्यायालयात मांडून दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायाधिशांनी या तिघांची रवानगी येत्या 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत केली.

एसआयटीमार्फत तपास होणार

नीटपाठोपाठ टीईटीचा पेपर फुटल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाणे पोलिसांच्या एसआयटीमार्फत सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी चर्चा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी 20 पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे.

मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

आग्रा येथील प्रिंंटिग प्रेसमध्ये अत्यंत कडक बंदोबस्तात छापण्यात आलेला हा पेपर लिक झाला कसा, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. अद्यापपर्यंत या पेपर फुटीतील मुख्य सूत्रधाराचे नाव पुढे आलेले नाही.