FIFA World Cup 2026 – आफ्रिकेच्या जंगलातून फुटबॉलचे नवे राजे, दहापैकी नऊ आफ्रिकन संघांनी बाद फेरी गाठण्याचा केला पराक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकेकाळी वर्ल्ड कपमध्ये आफ्रिकन संघ म्हणजे लग्नात आलेला दूरचा नातेवाईक. आला, हसला, फोटो काढला आणि दोन-तीन सामन्यांनंतर घरी गेला. ब्राझील, अर्जेटिना, जर्मनी, इटली, फ्रान्स यांच्या महालात आप्रिका म्हणजे पाहुणा. ट्रॉफीच्या टेबलाजवळ त्याला खुर्चीही मिळत नसे.

 

१९९० मध्ये कॅमेरूनने पहिल्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली तेव्हा जगाने डोळे चोळले. २००२ मध्ये सेनेगलने फ्रान्सला धक्का दिला. २०१० मध्ये घानाच्या डोळ्यांसमोर उपांत्य फेरी होती, पण लुईस सुआरेझच्या हाताने आणि नशिबाने ती स्वप्ने मोडली. २०२२ मध्ये मोरोक्कोने उपांत्य फेरी गाठून इतिहास लिहिला. पण यंदा… आफ्रिकेने इतिहास लिहिला नाही, तर इतिहासाची वहीच बदलून टाकली. फुटबॉलच्या भाषेत याला यश म्हणत नाहीत… याला क्रांती म्हणतात !

 

मोरोक्कोने ब्राझीलला रोखत पुन्हा सांगितलं, कतार हा अपघात नव्हता. दक्षिण आफ्रिकेने घरचा आत्मविश्वास दाखवला. सेनेगल, आयव्हरी कोस्ट, घाना आणि इजिप्त यांनी अनुभवाची तलवार धारदार ठेवली. केप व्हर्डेन छोट्या बेटाचं नाव महासागराएवढं मोठं करून दाखवलं आणि मग मैदानांवर दोन नवे नायक आले… कोंगो आणि अल्जेरिया. कोंगोची गोष्ट तर एखाद्या सिनेमालाही लाजवेल. तब्बल ५२ वर्षे वर्ल्ड कपमध्ये विजयाची वाट पाहणारा संघ.

उझबेकिस्तानविरुद्ध दहाव्या मिनिटालाच गोल खाऊन मागे पडला. अनेक संघांनी तिथेच गुडघे टेकले असते. पण कोंगोच्या खेळाडूंनी जणू आफ्रिकेच्या जंगलातल्या सिंहाची आठवण काढली. योआन विसाने दोन गोल झळकावले, फिस्टन मेयेलेने निर्णायक वार केला आणि ३-१ अशी ऐतिहासिक विजयगाथा लिहिली. हा फक्त विजय नव्हता, ५२ वर्षांच्या प्रतीक्षेला मिळालेलं उत्तर होतं.

 

अल्जेरियाने ऑस्ट्रियाविरुद्ध ३-३ अशी बरोबरी साधली. काही बरोबरी विजयापेक्षाही मोठ्या असतात. हा त्यापैकीच एक सामना. शेवटच्या शिट्टीपर्यंत त्यांनी हार मानली नाही आणि बाद फेरीचं तिकीट खिशात टाकलं. पूर्वी आफ्रिकन संघांना युरोपियन संघ पाहिले की ताप यायचा. आता ताप युरोपला येतो आहे!’

 

एकेकाळी आफ्रिकन फुटबॉलकडे ताकद होती, वेग होता, पण डोकं शांत नव्हतं. आता वेग आहे, ताकद आहे, शिस्त आहे आणि डावपेचही आहेत. युरोपियन क्लबमध्ये खेळणाऱ्या नव्या पिढीने आफ्रिकन फुटबॉलला नवं व्यक्तिमत्त्व दिलं आहे. त्यामुळे आता ते फक्त नाचत मैदानात येत नाहीत, ते प्रतिस्पर्थ्यांना नाचवत मैदानातून बाहेर पाठवतात.

 

या विश्वचषकाने एक गोष्ट निर्विवाद सिद्ध केली आहे की, फुटबॉलचा नकाशा बदलत आहे. पूर्वी विश्वचषक जिंकण्यासाठी युरोप किंवा दक्षिण अमेरिका पुरेशी होती. आता त्या समीकरणात आफ्रिकेचं नाव ठळक अक्षरात लिहावंच लागेल. कदाचित ट्रॉफी अजून आफ्रिकेत पोहोचलेली नाही. पण तिचा रस्ता आता सहाराच्या वाळवंटातून जातो आहे, हे जगाने ओळखलं आहे.