
पाऊस गायब झाला असताना हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधारेचा अंदाज आज व्यक्त केला. येत्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र, कोकणासह राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात दक्षिण-पश्चिम मान्सूनसाठी अतिशय अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत राज्याच्या विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पडेल, असे नमूद करत हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला.
मुंबई शहर आणि उपनगरांत गेल्या आठवड्यात पावसाने वेळोवेळी हूल दिली होती. नंतर मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आणि एका दिवसातच निम्म्या महिन्याचा पाऊस पडला. पावसाच्या सरासरीची उर्वरित तूट येत्या आठवडाभरात भरून निघण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) तसा अंदाज वर्तवत सावधगिरीचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. 28 ते 30 जूनदरम्यान कोकण किनारपट्टी भागात तसेच गोव्याच्या बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. 1 ते 4 जुलैदरम्यान कोकणात पावसाचा जोर आणखी वाढेल, अनेक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडेल. तसेच 2 ते 4 जुलैदरम्यान घाट माथ्यावरील दुर्गम भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळेल, असे भाकीत करीत हवामान खात्याने संबंधित भागांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने त्या-त्या भागांतील स्थानिक प्रशासनांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. वादळी वाऱ्यांचा तडाखा अनेक जिह्यांना बसण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. 41 ते 44 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात चक्राकार वारे
अरबी समुद्रातील वाऱ्यांच्या दिशेत मोठा बदल झाला आहे. त्याचा प्रभाव मान्सूनच्या सक्रियतेवर दिसून येणार आहे. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पावसाचा जोर वाढणार आहे, असे हवामान खात्याने आपल्या अंदाजात म्हटले आहे.


























































