
दिल्लीतील सरकारी रुग्णालयांसाठी औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत तब्बल ६५० कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी दिल्लीतील भाजपच्या रेखा गुप्ता सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीत २७ वर्षांनंतर सत्तेत आलेल्या आणि केवळ १६ महिने पूर्ण केलेल्या सरकारने हा मोठा घोटाळा केला असून, हा एक सुनियोजित कट असल्याचा दावा भारद्वाज यांनी केला आहे. यात संपूर्ण सरकारचा सहभाग असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
या घोटाळ्याची माहिती देताना सौरभ भारद्वाज म्हणाले की, १० जुलै २०२५ रोजी सरकारने एक आदेश काढून रुग्णालयांचा स्वतः औषधे किंवा वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याचा अधिकार काढून घेतला. ही सर्व खरेदी सेंट्रल प्रोक्योरमेंट एजन्सी मार्फतच केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला. या दबावामुळे तत्कालीन आरोग्य सेवा महासंचालक (DGHS) डॉ. रती मक्कड यांनी जुलै २०२५ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारने ऑगस्ट २०२५ मध्ये वरिष्ठ डॉक्टरांना डावलून डॉ. वत्सला अग्रवाल यांच्याकडे डीजीएचएसपदाचा कार्यभार सोपवला. विशेष म्हणजे, आपचे आमदार सोमनाथ भारती यांनी अग्रवाल यांच्याविरोधात आधीच दक्षता विभागाकडे तक्रार केली होती. त्यांच्यावर चौकशी सुरू असतानाही त्यांना हे महत्त्वाचे पद कसे दिले गेले, यावर भारद्वाज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
खरेदीतील आर्थिक गैरव्यवहाराचे धक्कादायक आकडे समोर ठेवताना भारद्वाज यांनी अनेक उदाहरणे दिली. त्यांनी सांगितले की, जी एक्स-रे मशीन बाजारात १० लाख रुपयांना मिळते, ती सरकारकडून २५ लाख रुपयांना खरेदी करण्यात आली. केवळ १५ रुपयांना मिळणारे ओआरएसचे पाकीट तब्बल २०५ रुपयांना विकत घेण्यात आले असून, असे एकूण ५० लाख ओआरएस पॅकेट्स खरेदी करण्यात आले आहेत. याशिवाय, सरकारी जेम पोर्टलवर १५० रुपयांना मिळणारी रुग्णालयातील चादर तीनपट अधिक दराने म्हणजेच ४५० रुपयांना खरेदी करण्यात आली. दिल्ली सरकारच्या रुग्णालयांमध्ये एकूण १५,६५९ खाटांची क्षमता असताना, चक्क १६ लाख ६६ हजार ६६६ चादरी खरेदी करण्यात आल्या आहेत. एका खाटेमागे १०६ चादरी असा हा हिशोब असून केवळ चादरींच्या खरेदीवर ७५ कोटी रुपये उधळण्यात आले आहेत.
हा घोटाळा केवळ डॉ. वत्सला अग्रवाल या एकट्या करू शकत नाहीत, एवढे मोठे धाडस त्यांच्यात नाही. यामागे सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. एका भ्रष्ट अधिकाऱ्याकडे CPA चा कार्यभार देऊन सरकारनेच या घोटाळ्याला खतपाणी घातले आहे, असा घणाघात सौरभ भारद्वाज यांनी केला.

























































