
मुलुंड पश्चिम येथील मानवदेवी अग्रवाल रुग्णालयात सातत्याने होणारी रुग्णांची हेळसांड आणि कामगारांचे प्रश्न याविरोधात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रशासनाला धारेवर धरत कामगारांच्या समस्या व मागण्या मांडण्यात आल्या.
रुग्णालयात हमाल असून लिपिक म्हणून काम करणारे गोरख मगर हे कामगारांच्या विरुद्ध काम करीत असून त्यांची मनमानी वाढली आहे. त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी कामगारांची प्रमुख मागणी आहे. या मागणीची दखल घेऊन प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमुख वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून ताबडतोब बदली करण्यास सांगितले. प्रशासनाकडून तसा प्रस्ताव बनवून बांद्रा कार्यालयात पाठविला. याशिवाय रुग्णांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. सदर रुग्णालयात सर्व सोयी उपलब्ध झाल्या नाहीत तर रुग्णालय बंद करावे लागेल, असा इशारा शिवसेना व मनसेने दिला. या वेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना अध्यक्ष बाबा कदम, उपाध्यक्षा रंजना नेवाळकर, माजी नगरसेविका हेमलता सुकाळे, अजय राऊत, सत्यवान दळवी, योगेश सावंत, राजेश चव्हाण, लक्ष्मी सोनावणे, राजेंद्र देशमुख, संदीप कदम, शशांक माईनकर, धामापूरकर व पदाधिकारी उपस्थित होते.


























































