
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्रात 15 वर्षांपूर्वी झालेल्या नळजोडणी घोटाळय़ाचा निकाल आज अखेर जिल्हा व सत्र न्यायालयात लागला. पाणीपुरवठा विभागातील प्लंबर व अधिकाऱयांसह 11 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्रातील पाणीपुरवठा विभागात काम करणारे अभियंते, कर्मचारी, प्लंबर व काही खासगी व्यक्ती यांनी संगनमताने नळजोडणी घोटाळा केला. नागरिकांकडून नळजोडणीकरिता पैसे घेतले आणि बनावट कागदपत्रे तयार केली. त्यावर अधिकाऱयांच्या सह्या व शिक्केदेखील मारले. अशा प्रकारे घोटाळा करून अनधिकृतपणे नळजोडण्या दिल्या, असा आरोप दिवंगत नगरसेवक वामन म्हात्रे यांनी केला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी याबाबत पालिका प्रशासनासह विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.




























































