
पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत एका शेतकरी महिलेच्या खात्यात केवळ एक पैसा जमा झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. खरे म्हणजे या शेतकऱयाच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता येणे अपेक्षित होते. मात्र जेव्हा महिलेच्या मोबाइलवर आलेला मेसेज पाहिला तर या महिलेच्या खात्यात केवळ एक पैसा जमा झाल्याचे मेसेजमध्ये दिसले.
ही घटना भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा गावात घडली आहे. 65 वर्षीय लाभार्थी महिलेचा मुलगा खेमराज गिरेपुंजे याने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्याची आई लक्ष्मीबाई यांना या योजनेचा हप्ता म्हणून त्यांच्या बँक खात्यात 0.01 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला, तेव्हा संपूर्ण कुटुंब हवालदील झाले. सध्या महत्त्वाचा खरीप पेरणीचा हंगाम सुरू आहे. बियाणे आणि खतांसाठी पैशांची तातडीची गरज असताना सरकारकडून केवळ एक पैसा पाठवण्यात आल्याने ही शेतकऱयांची क्रूर चेष्ठा केल्यासारखे झाले आहे.
या महिलेला जो मेसेज आला, तो एका तांत्रिक चुकीमुळे आला आहे. मुख्य हप्ता आधीच जमा करण्यात आला आहे. तांत्रिक बिघाडामुळे लाभार्थ्याला तो मेसेज गेला असावा. शेतकरी महिलेच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत, असे भंडारा जिल्हा कृषी अधिकारी संगीता माने यांनी म्हटले आहे.





























































