
>> प्रभाकर पवार, [email protected]
हिंदू पंचांगानुसार १८ जून २०२६ रोजी श्री दत्तगुरूंचा वार होता. सकाळचे १० वाजले होते. डोक्यावर सूर्य आग ओकत होता. तरीही पुणे शहरात राहणारी २० वर्षीय सिया गोयल व तिचा होणारा २६ वर्षीय पती केतन अग्रवाल सह्याद्रीच्या कुशीत दिमाखात उभ्या असलेल्या लोहगड किल्ल्याच्या ३०० दगडी पायऱ्या चढून गडाच्या ३ हजार ३८९ फूट उंचीवर पोहोचले. त्यापाठोपाठ सियाचा प्रियकर चेतन चौधरी भर उन्हात हुडी जॅकेट घालून गडावर पोहोचला. सियाने केतनला ठरल्याप्रमाणे डोंगराच्या कड्यापर्यंत नेले. चेतनला हाताने इशारा केला. शिवाजी महाराजांच्या काळात गद्दारी करणाऱ्यांना शिक्षा म्हणून जसे डोंगराच्या कड्यावरून ढकलून दिले जात होते, कडेलोट केला जात होता, तसाच सिया व चेतनने बेसावध केतनचा कडेलोट केला. का? तर केतनला डोक्यावर छोटे टक्कल पडले होते. तो तोतरा बोलत होता. सियाला केतन न आवडण्याची ही कारणे होती. सियाच्या आई-वडिलांनी केतन हा सुखवस्तू कुटुंबातील काही हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक असल्याने त्याच्यासोबत तिचे लग्न लावून देण्याचे ठरविले. साखरपुडाही केला. सियाने आपल्या मारवाडी कुटुंबीयांची बदनामी होईल म्हणून लग्नाला विरोध केला नाही. उलट कुणाला संशय येणार नाही अशा पद्धतीने केतनला ठार मारायचा कट आपला प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने रचला, परंतु तो अयशस्वी ठरला. केतन पाय घसरून दरीत ४०० फूट खाली पडून मृत्यू पावला हा सियाचा बनाव काही तासांतच उघडा झाला. सिया व चेतन या दोघांना लोणावळा पोलिसांनी अटक केली. मयत केतनचे वडील विशाल अग्रवाल बांधकाम व्यावसायिक आहेत, तर सियाचे वडील प्रवीण गोयल मार्केट यार्डातील मसाले विक्रीचे बडे व्यापारी आहेत.
डोक्याला एक छोटा ‘पॅच’ असल्याने केतन विग वापरत होता हे आम्ही मुलीला व तिच्या आई-वडिलांना साखरपुड्यापूर्वी सांगितले होते. मग त्या मुलीने माझ्या मुलाचा खून करायची काय गरज होती? असा सवाल केतनचे वडील विशाल अग्रवाल करीत आहेत, तर सिया या मुलीची आई म्हणते, आमची मुलगी दोषी असेल तर तिला फासावर लटकवा. तिलाही कड्यावरून ढकलून द्या!
बरेच आई-वडील मुलांच्या संमतीशिवाय लग्न लावून देतात. मुलीला न आवडणाऱ्या मुलाच्या गळ्यात बांधतात. पुढे केतन-सियासारखे विपरीत घडते. मध्य प्रदेशातील इंदूरमधील खांडेलवाल वैश्य समाजातील राजा रघुवंशी (२९) व सोनम (२४) यांचे गेल्या वर्षी ११ मे २०२५ रोजी पारंपरिक पद्धतीने इंदूरमध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर २० मेला हे नवदांपत्य हनिमूनला मेघालयात गेले. त्या भागातील जीवनशैली, परंपरा, संस्कृती समजून घेण्यासाठी त्यांनी एका कुटुंबीयाकडे ‘होम स्टे’ घेतला. २३ मेला चेक आऊट केले. वेईसॉडॉग या धबधब्याजवळ हे नवविवाहित गेले. तेथे अगोदरच वाट पाहत असलेल्या आरोपींनी राजा रघुवंशी यास घेरले. धारदार कुन्हाडीने व शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार करून त्याचा मृतदेह जवळच्या खोल दरीत फेकून दिला. त्यानंतर राजा रघुवंशी व सोनमचा आपल्या नातेवाईकांशी संपर्क तुटला. राजा व सोनमचे नक्की काय झाले हे समजायला मार्ग नव्हता. पैशांसाठी अपहरण करून कुणीतरी हत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला.
मेघालय पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करून राजा रघुवंशीवर हल्ला करणाऱ्या आरोपीना अटक केली. त्यातून राजाची पत्नी सोनम हिनेच सुपारी देऊन राजाची स्वतःच्या डोळ्यांदेखत हत्या घडवून आणल्याचे उघड झाले. अखेर उत्तर प्रदेश पोलिसांनी सोनम हिला तिचा शाळेतील प्रियकर राज कुशवाहसह गाझीपूर येथून अटक केली. तेव्हा सोनम पोलिसांना म्हणाली, “मी राजाबरोबरच्या लग्नाला विरोध केला होता. मी राज कुशवाहबरोबर पळून जाईन असेही आई-वडिलांना सांगितले होते, परंतु क्षत्रिय रघुवंश कुळाचा अभिमान असलेल्या माझ्या आई-वडिलांनी माझे काहीच ऐकले नाही.” राजा रघुवंशी हा इंदूरचा एक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक होता, तर सोनमच्या वडिलांचा प्लायवूडचा व्यवसाय आहे. ‘समाज परिचय’ पुस्तिकेत राजा रघुवंशी व सोनमची नावे लग्न जुळविण्यासाठी नोंदली गेली होती. त्यातून या दोघांचे लग्न ठरले होते, परंतु १२ दिवसांत सोनमने राजा रघुवंशीचा घात केला.
गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात लंडनहून पत्नीच्या वाढदिवसासाठी मेरठला परतलेल्या सौरभ राजपूत (२९) या नौदल अधिकाऱ्याची त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी (२७) व तिचा शाळेतील प्रियकर साहिल शुक्ला (२५) या दोघांनी चाकूने भोसकून घरातच हत्या केली व त्याचे तुकडे करून ते एका प्लॅस्टिक ड्रममध्ये डम्प केले. त्यावर सिमेंट टाकून सील केले. मुस्कान व साहिल या दोघांना पोलिसांनी अटक केली. ही केस उत्तर प्रदेशात आज ‘ब्लू ड्रम मर्डर केस’ म्हणून चर्चित आहे.
सोनम, मुस्कान यांनी कायदेशीर धार्मिक विधीनुसार आयुष्याचा जोडीदार बनलेल्या आपल्या नवऱ्यांचा, तर सिया हिने होणाऱ्या नवऱ्याचा नायनाट केला. पुण्याच्या एका तरुणीने वेगळीच शक्कल लढविली. आपल्या आई-वडिलांनी ज्या तरुणाबरोबर लग्न ठरविले होते. त्या सागर कदमचे हातपाय तोडायची सुपारी एका टोळक्याला दिली. दीड लाख रुपये मिळाल्यानंतर पाच-सहा तरुणांनी काम फत्ते केले. सागर कदमला रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली. चालता येणार नाही अशी अवस्था केली. हात-पाय फ्रैक्चर करून टाकले. पोलिसांनी २४ तासांत आरोपींना पकडले तेव्हा आरोपी कबुली देताना म्हणाले, “आम्हाला मयुरी दांडगेने दीड लाख रुपये सागर कदमचे हात-पाय तोडण्यासाठी दिले होते.” मयुरीच्या होणाऱ्या पतीला हे कळताच तो कोमात गेला.
सुखवस्तू कुटुंबातील वरपक्षाकडून लग्नाचा प्रस्ताव आल्यावर मुलीचे आई-वडील मुलीवर दबाव आणतात. त्या दबावाखाली बऱ्याच मुली आई-वडिलांच्या इच्छेपोटी होकार देतात, परंतु मुलगी कुणाच्या तरी प्रेमात अखंड बुडालेली असते हे आई-वडिलांना माहीत नसते. मुलीला आपला पहिला मित्रच ‘सेफ’ वाटतो. मुलीचा मेंदूही तिला तेच सांगतो. ‘डोपामाइन’ सारखे हॉर्मोन्स वाढल्यामुळे मुलीचे आपल्या जुन्या मित्राबरोबरचे आकर्षण वाढलेले असते असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. तेव्हा आई-वडिलांनी मुलीच्या मनाविरुद्ध लग्न लावून देणे शक्यतो टाळावे किंवा तिचे सायकॉलॉजिस्टकडून समुपदेशन करून घ्यावे. नाहीतर स्वतःच्याच काल्पनिक जगात असणाऱ्या वास्तवापासून दूर गेलेल्या सिया, सोनम, मुस्कान व मयुरीसारख्या ‘जेन झी’ पिढीचे काही खरे नाही. लहानपणापासूनच्या इंटरनेट, स्मार्टफोन व सोशल मीडियाच्या युगात वाढलेली ही तरुण पोरं काहीही करू शकतात कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. ते इम्पल्सिव्ह, भावनावश आहेत. परिणामांची पर्वाच करीत नाहीत हे वरील तरुणींची क्रूरता पाहून वाटते. सोनम वर्षभर जेलमध्ये काढून नुकतीच जामिनावर बाहेर आली आहे. मुस्कान अजूनही जेलमध्ये आहे. सोनम, मुस्कान व आता सिया। लक्झरियस जीवन जगलेली सिया वर्षभर तरी जेलचा कारावास भोगेल असे दिसते. सियाचा प्रियकर चेतन चौधरीला माफीचा साक्षीदार केला तरी ती ‘कन्विक्ट’ होईल, शिक्षा होईल हे पुरावे पाहता तरी संभवत नाही.





























































