
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील नव्याने सुरू करण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर भीषण दुर्घटना टळली. खोपोलीहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एर्टिगा कारवर मिसिंग लिंक बोगद्यातच दगड आदळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काच फुटून गाडीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, शेकडो कोटी रुपये खर्च करून एक महिन्यापूर्वीच खुल्या केलेल्या मिसिंग लिंकवरील या अपघाताने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
खोपोली येथे राहणारे उचप्पा वरचल्ली हे एर्टिगा कारने पुण्याच्या दिशेने जात होते. कार कनेक्टिंग लिंकच्या बोगदा क्रमांक दोनमधून जात असताना अचानक मोठा दगड काचेवर येऊन आदळला. दगड पडताच कारची समोरील काच फुटली. कारचालक उचप्पा यांच्या अंगावर कारच्या फुटलेल्या काचा पडल्या. याप्रकरणी कारचालकाने तक्रार दाखल केली नाही. हा घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच याची माहिती खंडाळा महामार्ग पोलीस केंद्राला मिळाली.
बचाव पथकाची धाव
खंडाळा महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक समीर कटपाळे आणि एम. एस. एफ जवान सुरेश ढेरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहाणी केली. याप्रकरणी कारचालकाने कोणतीही तक्रार केली नाही. कारचालक अपघातस्थळावरून कोणतीही तक्रार किंवा नोंद न करता निघून गेल्यामुळे शासकीय नियमानुसार ‘E-DAR’ आणि PM rahat’ पोर्टल वर या अपघाताची माहिती भरण्यात आलेली नाही, अशी माहिती खंडाळा महामार्ग पोलीस केंद्राचे उपनिरीक्षक समीर कटपाळे यांनी दिली. या घटनेने मिसिंग लिंकच्या कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
पुनर्मूल्यांकन करणार
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. बोगद्यातून वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने अशा घटना रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज आहे. संबंधित यंत्रणांकडून बोगद्याच्या सुरक्षिततेचे पुनर्मूल्यांकन करण्यात येणार असून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी दिली





























































