
कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गुजरातमधील तुरुंगात असताना त्याची टोळी राज्यात दहशत कशी निर्माण करत आहे? तुरुंगातून अथवा परदेशातून गुन्हेगारी कारवाया कशा नियंत्रित केल्या जात आहेत? असा सवाल विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला.
पिंपरी-चिंचवडमधील एका फर्निचर दुकानावर गोळीबार करण्यात आल्याच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मूळ प्रश्न विचारला होता. यावरील चर्चेत भाग घेताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरत गृहखात्याच्या अकार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारी टोळ्याची नवीन कार्यपद्धती सांगितली. आता या गुन्हेगारी टोळय़ा भाडोत्री गुंड आणतात. गोळीबार करून भीती पसरवण्याचे काम करतात. लॉरेन्स बिष्णोईला अटक झाल्यावर टोळीमध्ये फूट पडली. आरजू बिष्णोई व रोहित बोथरा अशा दोन टोळय़ा झाल्या आणि त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे; पण त्यांचा बंदोबस्त करण्यात येत आहे असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले.




























































